सीताबर्डीच्या फुटपाथवर पुन्हा अतिक्रमण कारवाई, महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची धडक मोहीम
By मंगेश व्यवहारे | Updated: August 19, 2023 13:11 IST2023-08-19T13:10:33+5:302023-08-19T13:11:54+5:30
शहरात गेल्या दोन महिन्यापासून अतिक्रमणाच्या कारवाई सुरू

सीताबर्डीच्या फुटपाथवर पुन्हा अतिक्रमण कारवाई, महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची धडक मोहीम
नागपूर : सीताबर्डी मेन रोडवरील फुटपाथवर किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे.
आठवड्याभरापासून सातत्याने ही कारवाई करण्यात येत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले आहे. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक ते महाल पर्यंत देखील अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट यांच्या निर्देशानुसार कडबी चौक, इंदोरा चौक, ऑटोमोटिव्ह चौक, गड्डीगोडाम चौक व एलआयसी चौक येथील जुने पोलीस बूथ काढण्यात आले. या चौकांमध्ये स्मार्ट वाहतूक पोलीस बुथ लावण्यात येणार आहे. शहरात गेल्या दोन महिन्यापासून अतिक्रमणाच्या कारवाई सुरू आहे. ही कारवाई महापालिकेचे सहा. आयुक्त हरिष राऊत, प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकर्डे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.