परीक्षा प्रणाली सक्षम करणार
By Admin | Updated: July 1, 2015 03:07 IST2015-07-01T03:07:54+5:302015-07-01T03:07:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची घडी विस्कटली आहे.

परीक्षा प्रणाली सक्षम करणार
नवनियुक्त प्र-कुलगुरू प्रमोद येवले : स्वीकारला पदभार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची घडी विस्कटली आहे. ही स्थिती दूर करून परीक्षा प्रणाली जास्तीतजास्त सक्षम करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे मत विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पदभार स्वीकारला.
यावेळी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव पूरण मेश्राम, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी.के. अग्रवाल उपस्थित होते. आॅनलाईन’ परीक्षा प्रणाली परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक करून अधिकाधिक विश्वसनीय करण्यावर माझा भर राहणार आहे. आजघडीला विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये अनेक समस्या असून, आॅनलाईन पद्धतीचा स्वीकार केल्यास यावर तोडगा काढता येऊ शकतो. डॉ. राजेश अग्रवाल समितीने दिलेल्या ‘एक्झाम रिफॉर्म’च्या शिफारशींचा स्वीकार करून, परीक्षा विभागातील कार्य गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून ‘एमकेसीएल’चा मुद्दादेखील लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल, असे डॉ. येवले म्हणाले. कुलगुरूंनी यावेळी प्र-कुलगुरूंचे अभिनंदन केले. परीक्षा विभागात सुधारणा लगेच होणार नाहीत. परंतु डॉ. येवले यांच्या नेतृत्वात परीक्षा प्रणालीला योग्य दिशा मिळेल, असे कुलगुरू म्हणाले.
यावेळी डॉ. पूरण मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले. उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकरण सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोहिते यांना निरोप
दरम्यान, विद्यापीठाचे उपकुलसचिव व प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते हे मंगळवारी निवृत्त झाले. त्यांना यावेळी निरोप देण्यात आला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यापीठाला नि:शुल्क सेवा देण्यास तयार असल्याचे मोहिते यांनी यावेळी सांगितले. मोहिते यांच्यानंतर आता डॉ. अनिल हिरेखण हे प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहतील.