कागदावरील संशोधन जमिनीवर उतरवा - मुख्यमंत्री
By Admin | Updated: February 6, 2015 02:14 IST2015-02-06T02:14:24+5:302015-02-06T02:14:24+5:30
पंदेकृव्ही दीक्षांत समारंभ; शेती ते बाजारपेठ साखळी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मतंव्य.

कागदावरील संशोधन जमिनीवर उतरवा - मुख्यमंत्री
अकोला : कृषी क्षेत्रासमोर शेतकरी आत्महत्या, नापिकी, अनियमित हवामान हे मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विस्ताराच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांना शेतकर्यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान, हवामानाला अनुकूल पिकाच्या जाती, संशोधन मोठय़ाप्रमाणात तयार असल्याचे सांगण्यात येत आहे, पण या संशोधनाचा कागदावरच ढीग जमा झाला असून, आता हे कागदावरील संशोधन शेतकर्यांच्या शेतात नेण्याची खरी गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोला येथे अधोरेखीत केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवार, ५ फेब्रुवारी रोजी आयोजित २९ वा दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे होते. या समारंभाला अकोला-वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (दापोली) माजी कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी, कुलसचिव ज्ञानेश्वर भारती, माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर, डॉ.गोविंदराव भराड, डॉ. व्ही.एम. मायंदे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी १0५३ स्नातक, स्नातकोतर आणि आचार्य अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती खडसे यांनी पदवी प्रदान केली. यामध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक चार सुवर्णपदक कृषी शाखेचा पदवीधर मनीष कुमार यांने प्राप्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध संशोधनात उल्लेखनीय काम करणारे संशोधक, शिक्षक व कर्मचार्यांना विविध पदके, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.