एम्प्रेस मॉल असुरक्षित!
By Admin | Updated: February 11, 2015 02:29 IST2015-02-11T02:29:34+5:302015-02-11T02:29:34+5:30
खरेदीसाठी किंवा विरंगुळा म्हणून वेळ घालविण्यासाठी आपण शहरातील आलिशान एम्प्रेस मॉलमध्ये जाण्याच्या विचारात असाल तर सावधान!

एम्प्रेस मॉल असुरक्षित!
नागपूर : खरेदीसाठी किंवा विरंगुळा म्हणून वेळ घालविण्यासाठी आपण शहरातील आलिशान एम्प्रेस मॉलमध्ये जाण्याच्या विचारात असाल तर सावधान! एम्प्रेस मॉलला महापालिकेच्या अग्निशमन विभागाने असुरक्षित घोषित केले आहे. या इमारतीत आग लागण्याचा तसेच आपातकालीन परिस्थिीतीत नागरिकांचा जीव जाण्याचा धोका होऊ शकतो. या संबंधी सचेत करणारे पत्र अग्निशमन विभागाने २१ जानेवारी २०१५ रोजी एम्प्रेस मॉलला पाठविले आहे.
गांधीसागर परिसरात के.एस.एल. इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे ‘एम्प्रेस सिटी’चे बांधकाम सुरू आहे. यातच ‘एम्प्रेस मॉल’ बांधण्यात आला आहे. या मॉलमध्ये दाखविण्यासाठी अग्निशमन उपकरणे लावण्यात आली आहे. मात्र, ती सुरू आहेत की नाही याचे प्रमाण ते अद्याप अग्निशमन विभागाला देऊ शकलेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाने मॉलला पत्र लिहून अग्निशमनसाठी काय उपाय योजले आहेत, अशी विचारणा केली होती. मात्र, आजवर मॉलने या संबंधीचा अहवाल महापालिकेला सोपविलेला नाही. संबंधित प्रकरणी २७ मार्च २०१४, ४ एप्रिल २०१४, २६ डिसेंबर २०१४ व २१ जानेवारी २०१५ रोजी अग्निशमन विभागाने मॉलला पत्र पाठविले आहे. या मॉलमध्ये एकदा आग लागली असता त्याचे मूळ शोधण्यात दीड तासाहून अधिक वेळ लागला होता. त्यावेळी आगीची माहिती अग्निशमन विभागाला न देता मॉल प्रशासने स्वत:च आग विझविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश येत नसल्याचे लक्षात येताच नंतर उशिरा अग्निशमन विभागाला कळविण्यात आले होते. (प्रतिनिधी)