एम्प्रेस मॉल व्यवस्थापन जेव्हा चोर बनते

By Admin | Updated: June 4, 2017 01:32 IST2017-06-04T01:32:21+5:302017-06-04T01:32:21+5:30

एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाने अख्खे दुकान चोरल्याचा अप्रत्यक्ष आरोप करण्यात आला असून, गणेशपेठ पोलिसांनी चक्क घरफोडीचा गुन्हा दाखल करून वसुली अधिकाऱ्याला अटक केली.

Empress mall management becomes a thief | एम्प्रेस मॉल व्यवस्थापन जेव्हा चोर बनते

एम्प्रेस मॉल व्यवस्थापन जेव्हा चोर बनते

अख्खे दुकान चोरल्याचा आरोप : वसुली अधिकाऱ्याला अटक, पीसीआर अन् जामिनही
राहुल अवसरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाने अख्खे दुकान चोरल्याचा अप्रत्यक्ष आरोप करण्यात आला असून, गणेशपेठ पोलिसांनी चक्क घरफोडीचा गुन्हा दाखल करून वसुली अधिकाऱ्याला अटक केली. त्याचा पोलीस कोठडी रिमांडही घेतला. या अधिकाऱ्याला शनिवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी इम्रान मर्चिया यांच्या न्यायालयाने १५ हजाराचा जात मुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर केला.
राकेश सुधाकर फरकसे (३०) रा. इंद्रनगर नरसाळा रोड, असे या वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्रकरण असे की, मुंबईच्या एडआॅन रिटेल प्रायव्हेट लिमिटेडने एम्प्रेस मॉल मॅनेजमेंटशी संपर्क करून एम्प्रेस मॉलमधील
तळमजल्यावरील ३४ ए क्रमांकाचे दुकान भाड्याने घेतले होते. एडआॅनने हे दुकान चालविण्यासाठी आपली फ्रेंचाईजी ब्ल्यूमून असोसिएटस्ला दिले होते. या असोसिएटस्च्या प्रमुख वंदना मनोज गट्टाणी या असून, त्या महाल अयाचित मंदिरजवळील रहिवासी आहेत. एडआॅनने या असोसिएटस्शी लेखी करार करून ९ फेब्रुवारी २०१६ पासून गट्टाणी यांना दुकान चालविण्यास दिले होते. करारानुसार दुकानाचे भाडे स्वत: एडआॅन कंपनीने देण्याचे आणि विजेचे बिल आणि मेंटेनन्सचे पैसे गट्टाणी यांनी भरावे, असे ठरले होते. गट्टाणी यांनी एडआॅन कंपनीच्या वूमन एक्सेसरीजचे दुकान सुरू केले होते. एडआॅन ही या दुकानाला लेडिज मटेरियल, चप्पल, जुते, पर्स, बॅग, इमिटेशन ज्वेलरी, कापड इत्यादी साहित्याचा विकण्यासाठी पुरवठा करीत होती. वर्षभर दुकान व्यवस्थित चालले. जानेवारी २०१७ मध्ये एम्प्रेस मॉल मॅनेजमेंट आणि एडआॅन कंपनीमध्ये भाडे थकल्याने वाद निर्माण होऊन २९ जानेवारी २०१७ पासून एम्प्रेस मॉल मॅनेजमेंटने गट्टाणी यांच्या दुकानातील वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे ३० जानेवारीपासून हे दुकान बंद होते. बऱ्याच काळापासून दुकान बंद असल्याने एम्प्रेस मॉल मॅनेजमेंटने दुकानातील माल जप्त करून हा माल एम्प्रेस मॉलमधील आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी सुरक्षितरीत्या ठेवला तसेच या दुकानाला आपले कुलूप लावले.

सीसीटीव्हीचे जाळे तरीही अख्खे दुकान गेले चोरी
१५ एप्रिल २०१७ रोजी वंदना गट्टाणी या आपल्या दुकानात आल्या असता त्यांना आपल्या दुकानाला वेगळे कुलूप लागलेले दिसले. दुकानातील संपूर्ण १७ लाखांचा माल बेपत्ता दिसला. त्यांनी लागलीच गणेशपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तब्बल एक महिन्यानंतर २५ मे २०१७ रोजी पोलिसांनी भादंविच्या ३८०, ४४८ (घरफोडी) कलमान्वये गुन्हा दाखल करून वसुली अधिकारी राकेश फरकसे याला ३० मे रोजी अटक केली. पोलिसांनी त्याचा ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावला. लागलीच त्याच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सौरभ राऊत यांनी काम पाहिले. आश्चर्य म्हणजे एम्प्रेस मॉलमध्ये सीसीटीव्हीचे जाळे पसरले असताना अख्खे दुकान चोरी गेले आणि पोलिसांनीही घरफोडीचा गुन्हा दाखल करून चक्क मॉल व्यवस्थापनेतील अधिकाऱ्याचा बळी घेतला.

Web Title: Empress mall management becomes a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.