नागपुरातील मिहानमध्ये रोजगाराचे सामर्थ्य, पण कंपन्यांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:54 PM2019-12-13T12:54:32+5:302019-12-13T12:54:55+5:30

मिहानमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण मोठ्या उद्योजकांनी रुची न दाखविल्याने या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे विदर्भातील युवक रोजगारापासून वंचित आहेत.

Employment potential in the city of Mihan in Nagpur, but the whiff of companies | नागपुरातील मिहानमध्ये रोजगाराचे सामर्थ्य, पण कंपन्यांचा कानाडोळा

नागपुरातील मिहानमध्ये रोजगाराचे सामर्थ्य, पण कंपन्यांचा कानाडोळा

Next

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील, याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असूनही उद्योगजगतात नागपूरबद्दल आकर्षण नाही. मिहानमध्ये मोठे उत्पादन उद्योग न आल्यामुळे त्यावर आधारित लहान उद्योग सुरू झाले नाहीत. मिहानमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण मोठ्या उद्योजकांनी रुची न दाखविल्याने या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहासाठी लाल गालिचा अंथरण्याची वेळ आली. पतंजलीने उत्पादन अजूनही सुरू केलेले नाही. त्यामुळे विदर्भातील युवक रोजगारापासून वंचित आहेत.
पूर्वी मिहानमध्ये ४ लाख युवकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण ती फोल ठरली. सध्या मिहानमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे. टीसीएस, टाल, एचसीएल, इन्फोसिस, एअर इंडिया एमआरओ, हेक्झॅवेअर बीपीएस, टेक महिन्द्र, डसॉल्ट-अंबानी एअरोस्पेस आदी मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. राज्य सरकारने सवलतीत जागा आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानंतर मिहानमध्ये मोठे उद्योग न येणे हे एक गूढच आहे.
निर्मिती प्रकल्पाअभावी मिहान मागे
मिहानमध्ये निर्यातक्षम विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) उभारण्यात आले. अन्य विशेष आर्थिक क्षेत्रांचे झाले तेच नागपूरबाबत झाले. एसईझेडमध्ये कोणताही उद्योग येण्यास तयार नाही. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांचा विश्वास संपादन करण्याकरिता विविध घोषणा केल्या. एकखिडकी परवानगीपासून अनेक निर्णयही झाले. पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही. मिहानच्या घसरणीचे मुख्य लक्षण म्हणजे निर्मिती क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग) मिहान मागे पडल्यामुळे हवी तशी रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. केवळ भारतातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत.

वीज समस्या नेहमीचीच
मिहानमध्ये वीज समस्या नेहमीचीच आहे. मिहानमधील उद्योगांना कमी दरात वीज पुरवठा करण्यासाठी या परिसरात वीज निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प उभारण्यात आले. पण कंपन्या न आल्यामुळे अखेर वीज निर्मिती बंद करावी लागली. आता कंपन्यांना महावितरणकडून जास्त दरात वीज घ्यावी लागत आहे.

कंपन्यांना केवळ ६० टक्के जागांचे हस्तांतरण
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे संचालित मिहान प्रकल्प ४०६१ हेक्टरवर आहे. त्यापैकी केवळ ६० टक्के जागा कंपन्यांना दिली आहे. त्यात एकूण ६० कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे उत्पादन सुरू आहे. सहा कंपन्यांचे बांधकाम वेगात आहे. चार नवीन कंपन्यांना नवीन जागा दिली आहे. ४३ कंपन्यांना पूर्वीच जागा दिलेली असून, त्यांनी अजूनही काम सुरू केलेले नाही. या कंपन्यांना चार वर्षांची वाढीव मुदत दिली आहे. काहींनी बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. डसॉल्ट-अंबानी एअरोस्पेस कंपनीत विमानाच्या कॉकपीटची निर्मिती सुरू झाली आहे. कॉकपीटच्या निर्मितीसोबत निर्यातही सुरू आहे.

औद्योगिक की शैक्षणिक हब?
मिहानमध्ये निर्मिती उद्योग येत नसल्यामुळे शैक्षणिक संस्थांचा भरणा होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात इतरत्र जमीन उपलब्ध असताना मिहानमध्ये राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था, लॉ स्कूल, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था यांनाही येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मिहानमध्ये उद्योगांसाठी महाविकास आघाडीने प्रयत्न करावेत
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने मिहानमध्ये मोठे निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि यासंदर्भात काही सवलतींची घोषणा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात करावी. मोठे उद्योग आल्यास लघु उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल, शिवाय उद्योजकांना दिलासा मिळेल.

Web Title: Employment potential in the city of Mihan in Nagpur, but the whiff of companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mihanमिहान