अखर्चित निधीमुळे अधिकाऱ्यांना वाढल्या
By Admin | Updated: August 1, 2015 03:58 IST2015-08-01T03:58:55+5:302015-08-01T03:58:55+5:30
जिल्हा परिषदेच्या सेस फंडात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तरतूद केली जाते.

अखर्चित निधीमुळे अधिकाऱ्यांना वाढल्या
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तरतूद केली जाते. परंतु गेल्या वर्षाचा निधी अखर्चित असल्याने समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सटेंबर महिन्यात पंचायत राज समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहे. जि.प.च्या विविध योजनांचा आढावा घेणार असून यात प्रामुख्याने अखर्चित निधी संदर्भात विचारणा होण्याची शक्यता असल्याने सायकल वाटपाचा मुद्दा वेगळे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समिती आॅगस्ट महिन्यातच येणार होती. परंतु दौरा पुढे ढकलल्याने अधिकाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाने २०१४-१५ या वर्षात सायकल वाटपासाठी १ कोटीची तरतूद असूनही मागील वर्षात विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नाही. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने यंदाच्या सत्रात शाळा सुरू होताच विद्यार्थ्याना सायकल मिळण्याची आशा होती. परंतु वाटाघाटीच्या वादात अद्याप वाटप झालेले नाही.
गुरुवारी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत सायकल वाटपावर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षाचा निधी अद्याप खर्च न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सदस्यांना समप्रमाणात सायकलचा कोटा देण्याऐवजी समिती सदस्यांनी इतर सदस्यांच्या तुलनेत चौपट सायकलीसाठी आग्रह धरला आहे. या वादात गेल्या दीड महिन्यापासून सायकल वाटप रखडले आहे. (प्रतिनिधी)