पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर महानिर्मितीचा भर
By Admin | Updated: December 13, 2015 03:00 IST2015-12-13T03:00:32+5:302015-12-13T03:00:32+5:30
भारनियमनाच्या गर्तेतून राज्याला बाहेर काढून २४ तास अखंड वीज देण्याच्या ध्यासाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत आहेत.

पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर महानिर्मितीचा भर
अॅग्रो व्हिजन : महानिर्मितीचा स्टॉल ठरला लक्षवेधी
नागपूर : भारनियमनाच्या गर्तेतून राज्याला बाहेर काढून २४ तास अखंड वीज देण्याच्या ध्यासाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्या कार्यप्रवण झाल्या असून महानिर्मितीने राज्याला २४ तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे. हे लक्ष्य गाठतानाच २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प महानिर्मितीतर्फे उभारण्यात येणार आहे. रेशीमबागच्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात महानिर्मितीच्या स्टॉल्सवरून ही माहिती नागरिकांना सांगण्यात येत असल्याने हा स्टॉल लक्षवेधी ठरला आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प, एलईडी लाईट्सचा उपयोग, सौर कृषीपंपाच्या माहितीसह येथे माहिती उपलब्ध आहे.
राज्य शासनाच्या ऊर्जाविषयक घोरणानुसार एकूण १४ हजार ४०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती वाढविण्यात येत आहे. सौर ऊर्जेची २५०० मेगावॅट वीजनिर्मितीची जबाबदारी महानिर्मितीवर टाकण्यात आली आहे. यासाठी १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून १२ हजार ५०० एकर जागेत हा प्रकल्प असेल. यासाठी सिंचन प्रकल्पांचे कालवे, कॅनल बँकवर सोलर पॅनल लावून जागेची बचत करण्यात येईल. सध्या महानिर्मिती १८० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करते आहे. चंद्रपूर, साक्री, बारामती येथे हे प्रकल्प कार्यान्वित आहेत. यातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न आहे.
विद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी राख उड्डाण पूल, सिमेंट रस्ते आदी उपयोगात आणून राखेचा १०० टक्के उपयोग करण्यात येणार आहे. यासोबतच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प डिसेंबर अखेर कार्यान्वित होईल. (प्रतिनिधी)