दीक्षाभूमीवरील सोहळ््याची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ
By Admin | Updated: October 13, 2016 03:50 IST2016-10-13T03:50:25+5:302016-10-13T03:50:25+5:30
धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते.

दीक्षाभूमीवरील सोहळ््याची परदेशी पाहुण्यांनाही भुरळ
बाबासाहेबांनी मानवतेसाठी केलेले कार्य मोठेच : व्यक्त केल्या भावना
नागपूर : धम्मच्रक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ््यासाठी देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणेही दीक्षाभूमीवर आले होते. यातील काहींनी पहिल्यांदा येथे भेट दिली होती. बाबासाहेबांबद्दल ऐकून व वाचनातून माहिती होती. मात्र येथे आल्यावर त्यांनी मानवतेसाठी किती अफाट कार्य केले याची प्रचिती आल्याची भावना काही परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.
त्रिरत्न बौद्ध संस्था आणि इंटरनॅशनल यूथ कॉन्वेंशनच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी कार्य केले जाते. याच माध्यमातून एक अभ्यासदौरा म्हणून बुद्धाचा मार्ग स्वीकारलेल्या काही विदेशी अनुयायांनी यावर्षी पहिल्यांदा नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. या समूहाशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. यातील स्कॉटलँडवरून आलेले सोनिया जेमामन व जेम्स बोलेन यांनी असा ‘अमेझिंग’ सोहळा कधीही न अनुभवल्याची भावना व्यक्त केली. जगात अनेक ठिकाणी वर्ण किंवा वंश भेदावरून एका वर्गाला श्रेष्ठ व एका वर्गाला कनिष्ठ मानून त्या वर्गाच्या मानवाधिकाराचे हनन करण्याचा इतिहास आहे. या भेदभावाविरोधात ज्यांनी लढा दिला ते महान होते. डॉ. आंबेडकर यांनीही भारतात जातीभेदामुळे होणाऱ्या मानवतेविरोधी परिस्थितीशी लढा दिला आणि धम्मक्रांतीने रक्ताचा एक थेंबही न सांडविता परिवर्तन घडविले. येथे आल्यावर त्यांच्या मानवतेच्या महान कार्याची प्रचिती आल्याची भावना जेम्स बोलेन यांनी व्यक्त केली.
इंग्लंडहून आलेल्या जोमी क्रॉस व बेथ व्हाईटहाऊस या दीक्षाभूमीवरील गर्दी आणि हा सोहळा पाहून भारावल्या होत्या. इंटरनॅशनल यूथ कन्वेंशनशी वर्षभरापासून जुळलो आहोत आणि यादरम्यान बाबासाहेबांबद्दल बराच अभ्यास केला आहे. मात्र येथे आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची महती लक्षात आल्याचे बेथने सांगितले. बाबासाहेब इंग्लंडच्या विद्यापीठात शिकले याचा आम्हाला अभिमान आहे. आता इंग्लंडला गेल्यावर आधी त्या विद्यापीठाला भेट देणार असल्याचे बेथ हिने सांगितले.
जर्मनीची स्टिफन मिडनड्रॉफ आणि आॅस्ट्रेलियावरून आलेले रशेल विल्सन व अँजेला वाईली यांनी यानंतरही दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा व्यक्त केली. निघताना या सर्वांनी ‘जयभीम’ म्हणून निरोप घेतला.