गोंधळ घालणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:23+5:302021-02-08T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शांतिनगरातील नारायणपेठ येथे युवकाच्या एका समूहाने वस्तीत गोंधळ घालत असलेल्या गुन्हेगाराला संपविले. उपमुख्यमंत्री अजित ...

The elimination of the confusing criminal | गोंधळ घालणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा

गोंधळ घालणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शांतिनगरातील नारायणपेठ येथे युवकाच्या एका समूहाने वस्तीत गोंधळ घालत असलेल्या गुन्हेगाराला संपविले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच परिसरात आयोजित एका कार्यक्रमात असताना रविवारी घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. घटनेच्या चार तासानंतरही शांतिनगराचे ठाणेदार गणेश जामदार हे या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. विजू वागधरे (२३) रा. नारायणपेठ असे मृताचे नाव आहे.

विजू हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक होता. त्याच्याविरुद्ध हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजता विजूचे वडे फ्रेम कारखान्याजवळ राहणाऱ्या सुनील नावाच्या युवकाच्या भावांसोबत भांडण झाले. विजूने हल्ला करून सुनीलच्या भावांना जखमी केले. या घटनेची तक्रार करण्यासाठी ते शांतिनगर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले. शांतिनगर परिसरातच अपक्ष नगरसेविका आभा पांडे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार होत्या. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने शांतिनगर पोलिसांनी विजूला शोधण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. याच दरम्यान सायंकाळी ७ वाजता विजू सुनीलच्या घराजवळ आला. तो सुनीलच्या भावांना शिवीगाळ करीत गोंधळ घालू लागला.

विजूच्या कृत्याने सुनील व परिसरातील लोक संतापले. विजूने यापूर्वीही अनेकदा परिसरात गोंधळ घातला होता. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर राग होताच. संतापलेल्या लोकांनी शस्त्र, विटा, दगड, काठी घेऊन त्याच्यावर हल्ला केला. त्याला जागेवरच ठार करून फरार झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे पोलीस हादरले. समारंभात असलेले पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. विजूला रुग्णालयात पोहोचविल्यावर मृत घोषित करण्यात आले. नागरिकांनी गुन्हेगाराची हत्या करणे पोलिसांसाठी चिंताजनक बाब आहे.

शांतिनगर पोलीस ठाणे गुन्हेगारांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहे. नारायणपेठ संवेदनशील परिसर आहे. जुगार अड्डा चालविणाऱ्या बाल्या बिनेकर याचाही या परिसरात दबदबा होता. चार महिन्यापूर्वीच बाल्याचा खून झाला. त्यानंतर पुन्हा एकदा नारायणपेठ चर्चेत आले आहे. शांतिनगर पोलीस रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेत होते.

Web Title: The elimination of the confusing criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.