वाढीव वीज बिलाविरोधात एल्गार

By Admin | Updated: August 26, 2014 01:03 IST2014-08-26T01:03:20+5:302014-08-26T01:03:20+5:30

पाठविण्यात येणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात सोमवारी नागरिकांचा राग अनावर झाला. राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चात सहभागी होत नागरिकांनी वाढीव वीज बिलाविरोधात आवाज उठविला.

Elgar against increased electricity bill | वाढीव वीज बिलाविरोधात एल्गार

वाढीव वीज बिलाविरोधात एल्गार

स्पॅन्कोच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा : अधिकाऱ्यांना घेराव
नागपूर : पाठविण्यात येणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात सोमवारी नागरिकांचा राग अनावर झाला. राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चात सहभागी होत नागरिकांनी वाढीव वीज बिलाविरोधात आवाज उठविला. तुकडोजी चौकातील स्पॅनकोच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी स्पॅनकोविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांचे वीज बिल कमी करून दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू नागुलवार यांच्या नेतृत्वात मानेवाडा चौकातून मोर्चा काढण्यात आला. नवराज्य निर्माण महासंघ, विदर्भ आझाद सेना, राष्ट्रनिर्माण संघटनाही मोर्चात सहभागी झाल्या. मोर्चा तुकडोजी पुतळा चौकातील स्पॅनकोच्या कार्यालयावर धडकला असता कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलकांनी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. अधिकारी येईपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका नागुलवार यांनी घेतली. शेवटी अधिकारी आले. अधिकारी येताच त्यांना घेराव घालण्यात आला. कार्यालयात नागरिकांची गर्दी व घोषणाबाजीमुळे चर्चेत अडथळा येत होता. शेवटी कार्यालयाबाहेर येऊन नागुलवार यांनी स्पॅनकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नागुलवार यांनी सांगितले की, नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून अवास्तव विजेचे बिल पाठविण्यात येत आहे.
नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. सूचना न देता वीज कनेक्शन कापले जाते. बिलाच्या चौकशीसाठी नागरिक कार्यालयात येतात, तेव्हा त्यांना अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देतात, अशा तक्रारी मांडल्या. वाढीव बील आलेल्या नागरिकांच्या घरील मीटरची नागरिकांसमक्ष तपासणी केली जावी, त्रुटी निघाल्या तर वीज बिल दुरुस्त करून देण्यात यावे, अशी मागणी केली.
स्पॅनकोच्या अधिकाऱ्यांनी या मागण्या मान्य केल्या. सोबतच तक्रारींचे निवारण होईपर्यंत कुणाचेही वीज कनेक्श्न कापले जाणार नाही, अशी हमी दिली.
स्पॅनकोच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आंदोलक नमले, मात्र संबंधिक आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष बबिता मेहेर, किशोरसिंग बैस, दीपक निलावार, अ‍ॅड. सतीश इटकेलवार, अध्यक्ष विजय मारोळकर, नीलेश नागुलकर, विजय साळवे, श्रीधर बुराडे, प्रभाकर तांबे, नारायण निखारे, नितीन वझेकर, रामदास पांडे, चंद्रशेखर वैद्य, देवेंद्र कदम, विमल वाघमारे आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Elgar against increased electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.