अकरावीच्या २५ हजार जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:17+5:302021-02-05T04:51:17+5:30
नागपूर : महापालिकेच्या हद्दीतील ज्युनि.कॉलेजमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास आटोपलीच आहे. प्रवेश प्रक्रियेत झालेले प्रवेश व एकूण जागा ...

अकरावीच्या २५ हजार जागा रिक्त
नागपूर : महापालिकेच्या हद्दीतील ज्युनि.कॉलेजमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास आटोपलीच आहे. प्रवेश प्रक्रियेत झालेले प्रवेश व एकूण जागा लक्षात घेता, जवळपास ४० टक्के जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमध्ये अनुदानित ज्युनि. कॉलेजची संख्या मोठी आहे. भविष्यात संचमान्यता झाल्यास मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरविण्याची शक्यता आहे.
महापालिका हद्दीतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून घेण्यात येते. चारही शाखेच्या अकरावीच्या जागा ५९,२५० एवढ्या आहे. ऑगस्ट, २०२० महिन्यात अकरावीची पहिली प्रवेश फेरी झाली. त्यानंतर, तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या. आतापर्यंत ३४,४७९ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतले आहे. सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेचे झाले असून, त्यानंतर वाणिज्य शाखेत ५० टक्क्यांच्या वर प्रवेश झाले आहे. मात्र, कला आणि एमसीव्हीसीत ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.
- रिक्त जागांची संख्या दरवर्षी वाढतेय
गेल्या वर्षी अकरावीच्या २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा हा आकडा ४ हजारांनी वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते नागपूर जिल्ह्यात दहावीत अंदाजे ४० हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्या तुलनेत शहरातच ५९ हजार जागा आहे. शिक्षण विभागाने स्वयंअर्थ साहाय्यित शाळा, ज्युनि.कॉलेजला दिलेली परवानगी, वाढवून दिलेल्या तुकड्यांमुळे अनुदानित शाळांवर ही परिस्थिती आली आहे.
- ट्युशन क्लासेसशी असलेल्या टायअपमुळे अनुदानित ज्युनि.कॉलेजवर ही अवस्था आली आहे. अधिकारी डोळे झाकून नो ग्रॅण्डच्या शाळांना मंजुऱ्या देत आले आहेत. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्रीय प्रवेश समितीच रद्द करा, अशी आमची मागणी आहे. टायअप कॉलेजची चौकशी करा व गरज नसताना जागा कशा वाढल्या, याच्या चौकशीची मागणी याचिकेतून केली आहे.
रवींद्र फडणवीस, महा.राज्य शिक्षण संस्था महामंडळ
- या परिस्थितीला अधिकारीच जबाबदार आहे. टायअप असलेल्या अनेक ज्युनि.कॉलेजमध्ये मान्यतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित आहे. टायअपमुळे शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागातील ज्युनि.कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. त्याचा परिणाम अनुदानित ज्युनि. कॉलेजवर झाला आहे. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्ष असलेल्या शिक्षण उपसंचालकांनी अशा कॉलेजवर कारवाई करण्याची गरज आहे.
डॉ.जयंत जांभुळकर, प्राध्यापक
- नियमांकडे खो
टायअप कॉलेजात विद्यार्थी केवळ बोर्डाच्या परीक्षेत बसण्यासाठीच प्रवेश घेतात. विद्यार्थी ट्युशन क्लासमध्ये असतात, कॉलेजातील वर्ग बंद असतात. बोर्डाच्या परीक्षेत ७५ टक्के हजेरी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना बसूच द्यायला नको. कॉलेजची हजेरी तपासण्यासाठी विभागाची यंत्रणा असायला हवी. अधिकारी नियमांना धाब्यावर बसवून, मलिदा खात आहे.
प्रा.सपण नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षक भारती
- अकरावीच्या प्रवेशाची स्थिती
शाखा जागा झालेले प्रवेश रिक्त
कला ९,६६० ३,९५९ ५,७०१
वाणिज्य १८,००० ९,९२२ ८,०७८
विज्ञान २७,४६० १८,६१८ ८,८४२
एमसीव्हीसी ४,१३० १,९८० २,१५०
एकूण ५९,२५० ३४,४७९ २४,७७१