विजेच्या धक्क्यामुळे जीव जाऊ नये
By Admin | Updated: January 12, 2017 01:46 IST2017-01-12T01:46:21+5:302017-01-12T01:46:21+5:30
विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली.

विजेच्या धक्क्यामुळे जीव जाऊ नये
प्रसाद रेशमे यांनी मांडली भूमिका : ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक, वीज सुरक्षा सप्ताह सुरू
नागपूर : विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित वीज सुरक्षा सप्ताहाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. वीज निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, महावितरणचे मुख्य अभियंता रफीक शेख, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र प्रमुख अतिथी होते.
विजेपासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे, याबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, असा संकल्प महावितरणने केला आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे रेशमे यांनी सांगितले.
खोंडे यांनी जनजागृतीच्या माध्यमातून विजेचे अपघात कमी केले जाऊ शकतात, असे मत व्यक्त केले. रफीक शेख यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगितले. वीज आपल्यासाठी जेवढी आवश्यक आहे, तेवढीच धोकादायकही आहे. विजेचे अपघात कमी करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे, याकडे विकास मिश्र यांनी लक्ष वेधले.
वीज निरीक्षक उमाकांत धोटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, मनीष वाठ, ‘एसएनडीएल’चे बिझनेस हेड गौतम सेठ, मनपाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, वीज कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष शरद दुरुगकर, सचिव सचिन सावलकर, आर. पी. देशमुख, देवा ढोरे, अशोक ढोरे, विजय कारेमोरे, अनिल मानापुरे, अशोक पराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जनजागृती रॅली
सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर नागपूर वीज निरीक्षक, वीज निरीक्षक मंडळाचे अधीक्षक अभियंता व वीज कंत्राटदार संघटना यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. कस्तूरचंद पार्क, रामझुला, जगनाडे चौक, घाट रोड, अजनी, खामला, बजाजनगर, लोकमत चौक, झिरो माईल चौक, कस्तूरचंद पार्क असा रॅलीचा मार्ग होता.