महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी महावितरणचे उच्चस्तर लिपिक अलोक वाघ हे लाईनमन विजय माहुरे, कृष्णा रोकडे व सतीश मिरे यांना सोबत घेऊन लघुवेतन कॉलनी परिसरात थकबाकीदार वीज ग्राहक कल्याण सांगोळे याच्याकडील खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यास गेले होते. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चिडलेला कल्याण व त्याच्या इतर दोन साथीदारांनी सतीश मिरे यांना जमिनीवर खाली पाडून शिवीगाळ केली व दोघांनाही मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती महावितरणच्या एमआरएस उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीधर सोरते व सहायक अभियंता संजय भागवत यांना देण्यात आली. यानंतर महावितरणकडून या घटनेची रीतसर तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी कल्याण सांगोळे व रवि सांगोळे, कमलेश सांगोळे या दोन साथीदारांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपींना अटक करण्यात आली.
महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST