विद्युत खांब, ट्रान्सफार्मर रस्त्यावर
By Admin | Updated: May 3, 2015 02:12 IST2015-05-03T02:12:58+5:302015-05-03T02:12:58+5:30
लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला.

विद्युत खांब, ट्रान्सफार्मर रस्त्यावर
नागपूर : लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला. परंतु रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब व ट्रान्सफार्मर अद्यापही हटविण्यात आलेले नाहीत. रहदारीला अडथळा ठरत असलेले हे खांब अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासंदर्भात लालगंज सुधार संघर्ष समितीच्यावतीने मनपा आयुक्त, एसएनडीएल नागपूर विभाग, पोलीस आयुक्त, उत्तर नागपूर वाहतूक विभागाला निवेदन दिले, त्यानंतर स्मरणपत्रही दिले. परंतु उपाययोजना होत नसल्याने, संतप्त नागरिक व समितीने दोषी अधिकाऱ्यांच्या निंलबंन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रभाग १७, बस्तरवारी येथील लालगंज परिसरातील राऊत चौक ते दहीबाजार चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होऊन आठ वर्षे झाली. यात ३०वर विद्युत खांब व दोन ट्रान्सफार्मर रस्त्याच्या मधोमध आले. तसेच प्रेमनगर परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी झाले. यातही ३०वर विद्युत खांब व तीन ट्रान्सफार्मर रस्त्यावर आले. यामुळे आतापर्यंत अनेक वाहनचालक जखमी तर काही अपंग झाले आहेत. समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे यांनी सांगितले की, या परिसरात लवकरच मस्कासाथ उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. यामुळे हा पूल बंद झाल्यास खैरीपुरा, नाईक तलाव, बांगलादेश येथील वाहतूक दहीबाजार पुलावरून जाईल. सध्या दहीबाजार पुलाचे काम अर्धवट झालेले आहे. असे असतानाही शांतिनगर, कावळापेठ, कळमना, कामठी, कन्हान, जबलपूर-शिवनी, रामटेकपर्यंतची वाहतूक या पुलावरून जाते. जेव्हा मस्कासाथ पुलाचे काम सुरू होईल तेव्हा या पुलावरील वाहतूक दुप्पट होईल आणि याच मार्गावर रस्त्यावर आलेले विद्युत खांब आणि ट्रान्सफार्मर वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरेल.
१५ एप्रिल रोजी रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका विद्युत खांबाला वाहनाची धडक बसली. खांब खाली कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु खांब हटविण्यापासून नवीन खांब लावण्यापर्यंत परिसरातील वीज २४ तास खंडित होती. अशा अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत. याची दखल लालगंज सुधार संघर्ष समितीने घेत या दोन्ही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी १६ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, लकडगंज पोलीस स्टेशन, उत्तर नागपूर वाहतूक विभाग, मनपाच्या झोन क्र. ७ सतरंजीपुरा यांना निवेदन दिले. रस्त्यावरील खांब हटविण्याची मागणी केली. तसेच एसएनडीएलचे बिझनेस हेड खुराणा आणि शंकरपूरकर यांनाही खांब हटविण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी तीन महिन्यात खांब हटविण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतरही खांब जागेवर कायम होते. मात्र समस्या अद्यापही कायम आहे.