नागपूर विधान परिषदेसाठी आज निवडणूक; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 07:00 IST2021-12-10T07:00:00+5:302021-12-10T07:00:20+5:30

Nagpur News महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी  शुक्रवारी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे.

Election for Nagpur Legislative Council today; Administration ready | नागपूर विधान परिषदेसाठी आज निवडणूक; प्रशासन सज्ज

नागपूर विधान परिषदेसाठी आज निवडणूक; प्रशासन सज्ज

ठळक मुद्दे- असे आहेत उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (भाजप) रवींद्र प्रभाकर भोयर (काँग्रेस) मंगेश सुधाकर देशमुख (अपक्ष)कोरोना संशयितांना शेवटच्या तासात करता येणार मतदान

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी  शुक्रवार १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. एकूण ५५९ मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी गुरुवारी निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. सायंकाळी पत्रकार परिषद प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी कोविड प्रोटोकॉल अनिवार्य राहील. या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाईल. यात शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे. सर्व केंद्रांवर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे उपस्थित होत्या.

- ५५९ मतदार ; १५ मतदान केंद्रे

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५६० मतदारांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. हिंगणा पंचायत समितीमध्ये सभापतीपद रिक्त असल्याने उपसभापतीकडे पदभार आहे. त्यामुळे उपसभापतीला मतदानाचा अधिकार देण्याबाबतचे स्पष्टीकरण आयोगाकडे मागण्यात आले होते. आयोगाने अधिकार देता येत नसल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे ५५९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये महानगरपालिका १५५ जिल्हा परिषद ७१ व नगर परिषद आणि नगरपंचायत ३३३ अशी मतदारसंख्या आहे. नागपूर शहरातील तीन मतदान केंद्रे व ग्रामीण भागातील १२ अशा एकूण १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ४ असणार आहे.

- दोनच ओळखपत्रे ग्राह्य

मतदानाला येताना मतदाराला आपल्यासोबत भारत निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेले मतदार छायाचित्र, ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल, त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेले ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.

- पसंतीक्रम आवश्यक

मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदणे आवश्यक आहे. १,२,३ मराठी किंवा 1,2,3 इंग्रजी किंवा I,॥, III अशा रोमन आकड्यांमध्ये आपला पसंतीक्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाइल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण १५ मतदान पथके यासाठी कार्य करणार आहे.

- मतमोजणी बचत भवनात

बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे. १० ते १४ मतपेट्या बचत भवन येथील स्टॉंगरूममध्ये ठेवण्यात येतील. आज पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. या परिसरात उद्या १४४ कलम लागू होईल. याच ठिकाणी १४ तारखेला मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ४ टेबलवर मतमोजणी चालेल.

- तालुक्याचे सेतू केंद्र बंद

सर्व मतदान केंद्रे तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी १० डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी धारा १४४ लागू असल्यामुळे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात इतर लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Election for Nagpur Legislative Council today; Administration ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.