लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.सचिन सावंत म्हणाले, सफाई कामगार ज्या समाजातून येतात त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सफाई कामगारांचे बेहाल होते. त्यांना हाताने घाण उचलावी लागत होती. त्यांना या नरकीय यातनेतून बाहेर काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न तेव्हा केले नाही. त्यांची अवस्था पाहून स्वत: उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. उच्च न्यायालयाने ११ वेळा निर्देश दिले, तरीही उपाययोजना झाली नाही. उलट पंतप्रधानांनी लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे की, घाण साफ करणाऱ्यांना ते काम केल्याने अध्यात्म लाभते, ही मनुवादी मानसिकता आहे. त्यामुळे सफाई कामगारांचे पाय धुऊन तीर्थ म्हणून प्याले तरी ते विचार धुऊन निघणार नाही, असे ते म्हणाले.निवडणूक जवळ आल्याने जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे. सफाई कामगारांचे पाय धुणे त्याचाच एक भाग असून, दुसरीकडे नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. ही योजना फसवी असून, सहा हजार रुपयात शेतकऱ्यांचा कुठला सन्मान केला आहे, अशी विचारणा शेतकरीच करू लागले आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. गेल्या पाच वर्षांत जनतेला फसविण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. जनतेचे मत जनतेच्या पैशानेच विकत घेण्याचा हा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:04 IST
ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट-२ ला सुरुवात झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
निवडणूक जवळ आल्याने सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले : सचिन सावंत
ठळक मुद्देपंतप्रधानांवर टीका