वयोवृद्धांना चढावी लागत आहे ‘तिसरी मंझिल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:44+5:302021-03-04T04:13:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना ‘कोरोना’ लसीकरण सुरू झाले असले तरी अनेक केंद्रांवरील असुविधेमुळे त्यांना मनस्ताप सहन ...

वयोवृद्धांना चढावी लागत आहे ‘तिसरी मंझिल’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना ‘कोरोना’ लसीकरण सुरू झाले असले तरी अनेक केंद्रांवरील असुविधेमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हनुमान झोन अंतर्गत बुधवार बाजार मार्गावर स्थित विमा कर्मचारी इस्पितळातदेखील कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. मात्र तेथील ‘लिफ्ट’ बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चक्क पायऱ्यांनी तिसऱ्या मजल्यावर जावे लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
लसीकरण सुरू होण्याअगोदरच या इस्पितळाची ‘लिफ्ट’ बंद पडली आहे. मात्र तरीदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याशिवाय तेथे पिण्याचे पाणी व बसण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरीदेखील ‘कोरोना’ची लस घेण्यासाठी नागरिक पोहोचत आहेत व नाईलाजाने त्यांना उभे राहावे लागत आहे.
अव्यवस्थेमुळे गोंधळ
बुधवारी कर्मचारी विमा इस्पितळात असुविधा कायम असताना स्थानिक नगरसेविका रूपाली ठाकूर, भाजपचे झोपडपट्टी आघाडीचे शहराध्यक्ष परशू ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी समस्या दूर करण्याऐवजी अनावश्यक गोष्टी करून हात झटकण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी लसीकरणासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. केवळ ‘ऑफलाईन’ अर्ज करणाऱ्यांचीच व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणेदेखील कठीण झाले आहे. अव्यवस्थेच्या विरोधात कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शनदेखील केले, असे त्यांनी सांगितले.