वृद्धेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: February 15, 2015 02:28 IST2015-02-15T02:28:56+5:302015-02-15T02:28:56+5:30
नशेत तर्र असलेल्या नराधमांनी वृध्दाला मारहाण करून झोपडीबाहेर काढले आणि त्याच्या वृध्द पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

वृद्धेवर सामूहिक बलात्कार
नागपूर : नशेत तर्र असलेल्या नराधमांनी वृध्दाला मारहाण करून झोपडीबाहेर काढले आणि त्याच्या वृध्द पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ११ वाजता ही संतापजनक घटना घडली.
पीडित महिला ६० वर्षांची आहे. ती आपल्या वृध्द पतीसोबत हिंगणा - वानाडोंगरी मार्गावर झोपडपट्टीत राहते. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर वृध्द दाम्पत्य आपल्या झोपडीत झोपले. सर्वत्र सामसूम असताना दारूच्या नशेत तर्र असलेले तीन नराधम झोपडीत आले. त्यांनी वृध्दाला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आणि मारहाण करीतच वृध्देवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. अत्यंत गरीब आणि वृद्ध असलेले हे दाम्पत्य या अमानुष प्रकारामुळे एवढे हादरले की त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्याचीही हिंमत दाखवली नाही. नराधम पळून गेल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आज सकाळपासून झोपडपट्टीत संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना सूचना देण्यात आली.
माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, एपीआय गोरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. त्यांनी पीडित महिलेवर औषधोपचार करून घेतल्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली. शुक्रवारी सकाळपासून एक डझनपेक्षा जास्त संशयितांची चौकशी केल्यानंतर आरोपी राहुल गजभिये (वय २३) आणि संजू महातो (वय १८) या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना आज कोर्टात हजर करून पोलिसांनी १८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. पीएसआय प्रभाकर शिवूरकर, हवलदार दिलीप ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांनी आज रात्री पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)