एकनाथ खडसेंच्या वकिलांनी मांडली बाजू
By Admin | Updated: January 10, 2017 01:56 IST2017-01-10T01:56:49+5:302017-01-10T01:56:49+5:30
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन वाटपाबाबत सुरू असलेल्या चौकशीप्रकरणी सोमवारी झोटिंग

एकनाथ खडसेंच्या वकिलांनी मांडली बाजू
झोटिंग चौकशी समिती : बुधवारी पुन्हा सुनावणी
नागपूर : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन वाटपाबाबत सुरू असलेल्या चौकशीप्रकरणी सोमवारी झोटिंग समितीपुढे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. येत्या ११ जानेवारीपर्यंत पुन्हा सुनावणी होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते.
एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या नातेवाईकांना दिली. ही जमीन उद्योग विभागाची असून खडसे यांनी पदाचा दुरुपयोग करून ही जमीन दिल्याचा आरोप आहे. विरोधकांनी या कारणावरून घेरल्याने खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीचे कामकाज नागपूरवरून सुरू आहे. समितीने भोसरीला जाऊन जागेची पाहणी केली. मुंबई मंत्रालयातील उद्योग विभागाकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर दोन्ही विभागाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे समितीने मागवून घेतली. आपले मत मांडण्यासाठी खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या वकिलांनी शपथपत्र दाखल केले होते. दरम्यान महसूल आणि उद्योग विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले. हिवाळी अधिवेशन काळातच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. उद्योग विभगाचे सचिवही हजर झाले होते. त्यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान खडसे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. यात ते प्रत्यक्ष किंवा वकिलांच्यावतीने सुद्धा आपली बाजू मांडू शकतात. सोमवारी त्यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. मिळालेल्या माहितीनुसार खडसे यांच्यावतीने साक्षीदार ठेवायचे की नाही, यासंदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात असून त्यांच्या वकिलांनी याबाबत ११ तारखेपर्यंतची वेळ मागितल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)