आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: June 5, 2015 02:23 IST2015-06-05T02:23:00+5:302015-06-05T02:23:00+5:30
यशोधरानगर येथील एका आठ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या तरुणाने बलात्कार केला.

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
यशोधरानगर येथील घटना : नागरिकांची ठाण्यावर धडक
नागपूर : यशोधरानगर येथील एका आठ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या तरुणाने बलात्कार केला. या घटनेमुळे संतप्त कुटुंबीय आणि वस्तीतील नागरिक गुरुवारी सकाळीच यशोधरानगर पोलीस ठाण्यावर धडकले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अजय नागरवाडे (२२) याला अटक करून ठाण्यात आणले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजय हा डीजे आॅपरेटर आहे. तो पीडित मुलीच्या घरासमोरच राहतो. त्यामुळे तो नेहमीच तिच्या घरी येत-जात असे. ती त्याला ‘अजय भाऊ’ म्हणून हाक मारायची. बुधवारी रात्री पीडित मुलीचे आई-वडील आणि लहान भाऊ जेवण करीत होते. तर पीडित मुलगी ही घराला लागून असलेल्या काकाच्या घरी टीव्ही पाहत होती. आरोपी अजयसुद्धा रात्री ११ वाजता टीव्ही पाहायला आला. त्यानंतर मुलीच्या काकाला झोप येत असल्याने त्यांनी आरोपीला टीव्ही बंद करून घरी जाण्यास सांगितले. परंतु टीव्हीवरील चित्रपट थोड्याच वेळाने संपणार असल्याचे सांगून तो मुलीसोबत टीव्ही पाहण्यासाठी थांबला.दरम्यान मुलीच्या काकाला झोप लागली. रात्री सुमारे १२ वाजता अजय खोलीतील लाईट बंद करून मुलीसोबत बळजबरी करू लागला. ती ओरडण्याचा प्रयत्न करीत असल्याने तिचे तोंड दाबून ठेवले. त्याच वेळी पीडित मुलीची आई मुलीला घेण्यासाठी आली आणि तिने खोलीतील लाईट लावताच आरोपी मुलीसोबत बळजबरी करीत असल्याचे दिसले. तिने रागाने अजयची कॉलर पकडली परंतु आरोपी तिचा हात झटकून पळाला.
यादरम्यान काकालाही जाग आली. मुलीच्या आईने झालेला प्रकार सांगितला. तसेच आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या आईलाही झालेली घटना सांगितली. सकाळी झालेला प्रकार वस्तीत वाऱ्यासारखा पसरला. वस्तीतील तरुण आणि पीडित मुलीचे कुटुंबीय आरोपीला शोधत होते. नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)
महिला सफाई कर्मचाऱ्यावर बलात्कार
दोन महिन्यांपूर्वी ४० वर्षीय एका महिला सफाई कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ही एका खासगी रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. सुरज मनोहर लाहुत्रे (४०) रा. पंचशीलनगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सुद्धा त्याच रुग्णालयात सुपरवायझर म्हणून काम करतो. मार्च महिन्यात पीडित महिला स्टोअर रुममध्ये काम करीत असताना आरोपीने तिच्याशी बळजबरीपणे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.