आठ महिन्याच्या चिमुकल्याला अन्ननलिकाच नाही :
By Admin | Updated: July 13, 2015 02:33 IST2015-07-13T02:33:15+5:302015-07-13T02:33:15+5:30
घरात आधीच दारिद्र्य त्यात आठ महिन्याच्या भावेशच्या छातीमध्ये जन्मजात अन्ननलिकाच नाही.

आठ महिन्याच्या चिमुकल्याला अन्ननलिकाच नाही :
भावेशला जगविण्यासाठी हवा माणुसकीचा धर्म
पोटात टाकलेल्या नळीतून तो पितो दूध
नागपूर : घरात आधीच दारिद्र्य त्यात आठ महिन्याच्या भावेशच्या छातीमध्ये जन्मजात अन्ननलिकाच नाही. यामुळे डॉक्टरांनी त्याची थुंकी बाहेर निघावी यासाठी मानेत छिद्र करून नळी टाकली, तर त्याची भूक क्षमविण्यासाठी पोटात छिद्र केले. या छिद्रावाटे टाकलेल्या कृत्रिम नळीतून इंजेक्शनद्वारे दूध दिल्या जाते. डॉक्टरांनी यावर मोठी शस्त्रक्रिया सांगितली आहे. याचा खर्च तीन लाख रु. आहे. भावेशचे वडील प्रकाश डोईजड घराघरांत सिलिंडर पोहोचविण्याचे काम करतात. दरमहा मिळणाऱ्या पाच हजार रुपयांमध्ये चिमुकल्यावर उपचार करण्याचीदेखील या कुटुंबाची परिस्थिती नाही. त्यामुळे मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. वडिलांच्या तुटपुंज्या कमाईमुळे भावेशची आई अगतिक झाली आहे. चिमुकल्याला जगविण्यासाठी दारिद्र्यासमोर या कुटुंबाचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहेत.
नवीन गुजरवाडी, नागमंदिर रोड, वाघोडा, सावनेर येथे प्रकाश डोईजड राहतात. भावेशचा जन्म झाला तेव्हाच डॉक्टरांच्या लक्षात आले की त्याला अन्ननलिका नाही. दुसऱ्याच दिवशी भावेशवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडिलांनी पोटच्या मुलाला वाचविण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा केला. शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरांच्या लक्षात आले की छातीत अन्ननलिकाच नाही. तिथून ते पोटातील अन्ननलिकेमध्ये बरीच ‘गॅप’ आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘प्युअर इसोफेजिएल अॅट्रेसिया’ म्हणतात. यामुळे डॉक्टरांनी तात्पुरते म्हणून चिमुकल्याची थुंकी बाहेर निघावी यासाठी मानेत छिद्र केले तर दूध देण्यासाठी पोटात छिद्र करून नळी टाकली. परंतु दिवसेंदिवस खालावत असलेली भावेशची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. साधारण सात-आठ तास चालणाऱ्या या शस्त्रक्रियेत पोटातील आतडी काढून त्याला अन्ननलिकेशी जोडले जाईल. अत्यंत गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगितला. एवढा खर्च त्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. हातचे सर्वच संपल्याने कुटुंब अडचणीत आले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास भावेश वाचेल, ही एकमेव आशा आई-वडिलांना आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक मदतीचे आवाहन
कोवळ्या वयातच नियतीचे कठोर आघात सोसण्याची वेळ निष्पाप भावेशवर आली आहे. त्याला गरज आहे समाजाने मदतीचा हात देण्याची. हीच मदत त्याला पुन्हा जगण्याची उभारी देऊ शकते. भावेशला मदत करू इच्छिणाऱ्यांनी प्रकाश डोईजड यांच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद, महाल नागपूर येथील ६२२९३६२२७३१ या खाते क्रमांकावर मदत करावी, ९८८१३५९६५९या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.