गेटवर दक्षता चमूला रोखले
By Admin | Updated: July 7, 2014 01:12 IST2014-07-07T01:12:16+5:302014-07-07T01:12:16+5:30
गुन्हेगारांना मोबाईल, मादक पदार्थांचा पुरवठा आणि एषोआरामाच्या सुविधा पुरवणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने पुण्यावरून आलेल्या दक्षता चमुला तुरुंगात फिरण्यापासून रोखले.

गेटवर दक्षता चमूला रोखले
तुरुंगाच्या पाहणीसाठी टीम दाखल : पुण्यावरून निर्देश मिळाल्यावरच मिळाला प्रवेश
जगदीश जोशी - नागपूर
गुन्हेगारांना मोबाईल, मादक पदार्थांचा पुरवठा आणि एषोआरामाच्या सुविधा पुरवणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने पुण्यावरून आलेल्या दक्षता चमुला तुरुंगात फिरण्यापासून रोखले. दरम्यान अपर महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दक्षता चमुला प्रवेश देण्यात आला. पुण्यातील तुरुंग मुख्यालयाने एका आमदाराद्वारे गँगस्टरचा वाढदिवस साजरा केल्याच्या घटनेबाबत पाहणी करण्यासाठी दक्षता टीम पाठविली होती. पाहणी केल्यानंतर तुरुंगातील परिस्थिती जैसे-थे असल्याचे सांगितले जाते.
तुरुंगात गँगस्टरचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत गृहमंत्री आर.आर. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून तुरुंग प्रशासन हादरले आहे. तत्पूर्वी अपर महासंचालक मीरा बोरवणकर यांनी २८ जून रोजीच पुण्यावरून दक्षता टीम नागपूरच्या तुरुंगाची पाहणी करण्यासाठी पाठविली होती. तुरुंगात धाड टाकून तेथील परिस्थिती पाहण्याची टीमची योजना होती. सूत्रानुसार दक्षता टीम पहाटेच तुरुंगात पोहोचली होती. त्यांना सहज प्रवेश मिळेल, असा टीमच्या सदस्यांना विश्वास होता. परंतु तुरुंगाच्या मुख्य द्वारावर पोहोचताच त्यांना अडविण्यात आले. दक्षता टीमचे नेतृत्व करणारे सहायक आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याने आपली ओळख दिली आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेटवर असलेल्या पोलिसांनी अगोदर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचे सांगून त्यांना रोखून ठेवले. माहिती मिळूनही बऱ्याच उशिरापर्यंत तुरुंग प्रशासनातील कुठलेही अधिकारी दक्षता टीमच्या मदतीसाठी आले नाही. दरम्यान दक्षता टीम आल्याची माहिती कैद्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर आपत्तीजनक वस्तू तेथून हटविण्यात आल्या. तुरुंग अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तात्काळ माहिती मुख्यालयाकडे देण्यात आली. तेव्हा पुणे येथील मुख्यालयातून नागपूरच्या तुरुंग अधिकाऱ्यांना दक्षता टीमला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. हे निर्देश मिळण्यासाठी बराच वेळ निघून गेला. त्यामुळे तुरुंगातून दक्षता टीमला खाली हात परतावे लागले.
धोका लक्षात घेऊन परतले
तुरुंगाच्या आत पाहणी करताना दक्षता टीमला धोका असल्याचे दिसून आले. तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांसह दहशतवादी आणि नक्षलवादीसुद्धा कैद आहेत. कैद्यांच्या हावभावावरून दक्षता टीम घाबरली. काहीही हाती लागणार नाही, याची अगोदरच खात्री पटल्याने दक्षता टीम लवकरच परतली.