‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’वर प्रभावी उपचार
By Admin | Updated: January 11, 2017 02:42 IST2017-01-11T02:42:41+5:302017-01-11T02:42:41+5:30
देशात डोक आणि मानेच्या (हेड अॅण्ड नेक) कॅन्सरचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सरचे प्रमाण ३३ टक्के आहे.

‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’वर प्रभावी उपचार
१६ मेडिकलला दिले जाणार विशेष प्रशिक्षण : टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या निवृत्त डॉक्टरांचा पुढाकार
सुमेध वाघमारे नागपूर
देशात डोक आणि मानेच्या (हेड अॅण्ड नेक) कॅन्सरचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सरचे प्रमाण ३३ टक्के आहे. महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण ३१.४ आहे. यामुळे या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण राज्यात आढळून येतात. शासनाने याला गंभीरतेने घेत राज्यातील १६ मेडिकल रुग्णालयांमध्ये ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’च्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहे. यासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे निवृत्त कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलतान प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे. या हॉस्पिटलच्या निवृत्त विशेषज्ञाची एक चमू प्रत्येक मेडिकल रुग्णालयाच्या डॉक्टरांना या विषयी प्रशिक्षण देणार आहे. याची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातून होत आहे.
भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. या आजाराने हृदयाघात व मधुमेहास ही मागे टाकले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा असून उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यभारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के कॅन्सर तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरांमुळे होतो.