केवळ १७ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा
By Admin | Updated: June 30, 2014 00:48 IST2014-06-30T00:48:59+5:302014-06-30T00:48:59+5:30
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर

केवळ १७ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा
न्यायालय : पाच महिन्याचा लेखाजोखा
राहुल अवसरे - नागपूर
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर निर्दोष सुटण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे. ही प्रकरणे भारतीय दंड विधान आणि विशेष कायद्यांतर्गतची आहेत.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनाचे एकूण ३५ खटले चालले. त्यापैकी २५ प्रकरणातील आरोपी सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटले तर १० प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली, ३ आरोपींना दोन ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. खुनातील शिक्षेचे प्रमाण २८.५७ टक्के आहे.
बलात्काराचे एकूण १३ खटले चालून केवळ ३ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का), अमली पदार्थविरोधी कायदा, वीज कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतची प्रकरणे विशेष न्यायालयांमध्ये चालतात. त्यापैकी अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गतच्या केवळ एका प्रकरणात शिक्षा झालेली असून ११ प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. वीज कायद्यांतर्गतची सर्व तेराही प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. मोक्का, लाचलुचपत प्रतिबंधक आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.