शिक्षणाधिकाऱ्यांची नारायणा ई-टेक्नो विरोधात पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:07+5:302020-12-27T04:07:07+5:30
नागपूर : मान्यता नसतानाही पालकांकडून लाखो रुपये फी वसूल करून, पालकांची फसवणूक केल्या प्रकरणी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी वाठोडा ...

शिक्षणाधिकाऱ्यांची नारायणा ई-टेक्नो विरोधात पोलिसात तक्रार
नागपूर : मान्यता नसतानाही पालकांकडून लाखो रुपये फी वसूल करून, पालकांची फसवणूक केल्या प्रकरणी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात नारायणा ई-टेक्नो विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणी उपशिक्षणाधिकाऱ्यांकरवी शाळेची चौकशी केली होती. यात शाळेला मान्यता नसल्याचे सिद्ध झाले आहे.
वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका पालकाने हजारो रुपये फी भरूनही शाळेतील अध्यापनाची पद्धती व मुलाची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्याने शाळा सोडल्याचा दाखला मागितला होता. शाळेने त्या पालकाला शाळा सोडण्याचा दाखला किड्स प्ले स्कूल इंग्लिश प्रायमरी दाभा या शाळेचा दिला. त्या दाखल्यावर युडायस नंबर यशवंत इंग्लिश स्कूल दाभा येथील होता. त्यावरून या शाळेची बनवाबनवी पुढे आली होती. लोकमतने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकारी यांना चौकशीसाठी पाठविले होते. उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत शाळेला मान्यता नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ज्या शाळेची टीसी दिली व त्या टीसीवर युडायस नंबर असलेल्या शाळेचीही चौकशी केली. या चौकशीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात उचित कारवाई करण्यासंदर्भात तक्रार दाखल केली.
- शिक्षणाधिकाऱ्यांना बयाणासाठी बोलाविले आहे
शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उचित कारवाईसाठी आम्ही त्यांना बयाणासाठी बोलाविले आहे. त्यांच्या बयाणाअंती काय उचित कारवाई करता येईल, याचा निर्णय घेऊ असे वाठोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ताकसांडे यांनी सांगितले.