प्रभारी कुलगुरूसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही
By Admin | Updated: October 9, 2014 01:05 IST2014-10-09T01:05:58+5:302014-10-09T01:05:58+5:30
आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे.

प्रभारी कुलगुरूसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही
हायकोर्टाचा निर्णय : कुलपतींच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्यासही नकार
नागपूर : आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रभारी कुलगुरूसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, बुधवारी हा निर्णय दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात यावी व कुलपती यांना प्रभारी कुलगुरू नियुक्तीचा अधिकार देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा यासाठी सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम १२ (७) मधील तरतुदी लक्षात घेता न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. प्रा. सुनील मिश्रा यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज केला होता. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर गेल्या तारखेला न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी, कुलपतींतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर, विभागीय आयुक्तांतर्फे अॅड. आनंद परचुरे, विद्यापीठातर्फे अॅड. पुरुषोत्तम पाटील, तर शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी कामकाज पाहिले. कायद्यातील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम १२ (७) मध्ये प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणारी व्यक्ती सुयोग्य असण्यासोबतच आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण केलेलीही असली पाहिजे असे कोठेही म्हटलेले नाही. या कलमानुसार प्रभारी कुलगुरूपदी ‘सुयोग्य’ व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘सुयोग्य’ असलेल्या व्यक्तीकडे कुलगुरूपदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभवही असला पाहिजे एवढ्यावरच या कलमाचा अर्थ मर्यादित ठेवू शकत नाही. ‘सुयोग्य’ निकषापुढे ‘कोणीही’ हा शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द शैक्षणिक पात्रतेचे बंधन करीत नाही.(प्रतिनिधी)
अधिकाराच्या दुरुपयोगाचा आक्षेप फेटाळला
कुलपती यांना प्रभारी कुलगुरू नियुक्त करण्याचे असाधारण अधिकार देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याने या अधिकारावर घेतलेला आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावला. कुलपती यांच्याकडून अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो, केवळ या आधारावर कायदा चुकीचा असल्याचे ग्राह्य धरू शकत नाही. कुलपतींनी अधिकाराचा दुरुपयोग केल्यास वादग्रस्त निर्णय बदलविला जाऊ शकतो. तक्रारकर्ती व्यक्ती संवैधानिक न्यायालयात कधीही दाद मागू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कुणाला शैक्षणिक पात्रता आवश्यक
प्रभारी नियुक्ती करताना कोणकोणत्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे यासंदर्भातही न्यायालयाने खुलासा केला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक व कोणत्याही प्राधिकरण किंवा मंडळावरील सदस्य या पदांवर प्रभारी नियुक्ती करताना संबंधित व्यक्तीने त्या-त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.