वर्षभरात खाद्यतेलाचे भाव दुप्पट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:06 IST2021-04-19T04:06:55+5:302021-04-19T04:06:55+5:30
नागपूर : वर्षभरात सूर्यफूल खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाले असून, अन्य खाद्यतेलाच्या भावातही ६० ते ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

वर्षभरात खाद्यतेलाचे भाव दुप्पट !
नागपूर : वर्षभरात सूर्यफूल खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाले असून, अन्य खाद्यतेलाच्या भावातही ६० ते ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. अन्य जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यतेलाच्या दरवाढीने गरीब आणि सामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. भाव केव्हा कमी होतील, हे सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इतवारी येथील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, गेल्यावर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये खाद्यतेल ६० ते ७० टक्क्यांनी महाग झाले आहे. मोहरीचे नवीन पीक राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आले आहे. यंदा पीक चांगले आहे. भाव खुलला तेव्हा ५ हजार रुपये क्विंटल भाव होते. पण नंतर भाव ७३०० रुपयांवर गेले. मोहरी तेलामुळे अन्य खाद्यतेल कमी होईल, अशी अपेक्षा होती. पण कच्चा मालाचे भाव वाढल्याने तेलाचे भाव कमी होण्याची काहीही शक्यता नाही. त्याचा परिणाम अन्य तेलाच्या भावावर झाला. मोहरी तेलाचा उपयोग डाळींना पॉलिस करण्यासाठी होतो. या तेलाचे भाव वाढल्याने व्यापाऱ्यांचा ओढा जवस तेलाकडे वळला. त्यामुळे जवस तेलसुद्धा १५ दिवसांत प्रति किलो १५ रुपयांनी वाढून १६० रुपयांवर पोहोचले. याशिवाय काही दिवसांपूर्वी ४५०० ते ४७०० रुपये क्विंटल असणारे सोयाबीनचे भाव ७ हजार रुपयांवर गेले आहे. याशिवाय सोयाबीन ढेपची निर्यात बंद आहे. याशिवाय देशात विक्री कमी आहे. त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या भाववाढीवर झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आता चार महिन्यानंतर सोयाबीन, फल्ली आणि राईसचे पीक येणार आहे. तोपर्यंत जास्त भावातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
सरकार खाद्यतेलाचे भाव कमी करू शकतात. पाम, सोयाबीन आणि खाद्यतेलावर आधी ३७.५ टक्के आयात कर आकारला जायचा. तेलाच्या भाववाढीनंतर कर २७.५ टक्क्यांपर्यंत कमी केला. सरकारने आयात कर १० टक्क्यांनी कमी केला तर सर्व तेलाचे भाव प्रति किलो १० रुपयांनी कमी होऊ शकतात. देशात पामची १०० टक्के आयात, तर सोयाबीनची ५० टक्के अर्थात ५० लाख टन कच्चे तेल आयात केले जाते. विदेशात भाव जास्त असल्याने देशात आयातही महागल्याचे अग्रवाल म्हणाले.
खाद्यतेलाचा वर्षाचा भाववाढीचा तक्ता (प्रति किलो रुपये)
खाद्यतेल १५ एप्रिल २०२० १५ एप्रिल २०२१
सोयाबीन ९० रु. १५५ रु.
सूर्यफूल ९० रु. १८० रु.
जवस ९३ रु. १६० रु.
मोहरी १०० रु. १६० रु.
शेंगदाना ११० रु. १७५ रु.
पाम ८५ रु. १५० रु.
खोबरेल २०० रु. २४० रु.