लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. लॉइस कंपनीनंतर जिंदल ग्रुपही येथे गुंतवणूक करीत आहे. त्या उद्योगांना अनुसरून गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यांत दहा हजार एकर जागेवर इकोसिस्टम डेव्हलमेंट करण्यात येणार. आहे. चार हजार एकरच्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरीही मिळाली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रविवारी ते नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते. उदय सामंत यांनी सांगितले की, विदर्भात सातत्याने गुंतवणूक होत असल्याने हजारो लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. एमआयडीसी वस्त्रोद्योग धोरण राबवित असून, टेक्स्टाइल पार्क अमरावतीमध्ये साकारले जात आहे. तसेच नागपूरमध्ये जवापासून मद्यनिर्मिती उद्योग प्रस्तावित आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय नागपूरमध्ये प्रचलित असलेला अगरबत्ती क्लस्टरची माहितीही त्यांनी दिली.
महिला एमआयडीसीचे काम सुरूराज्यात प्रथमच नागपूरमध्ये कोराडी येथे महिला उद्योजिकांसाठी एमआयडीसी साकारली जाणार आहे. त्यासाठी जागेचे अधिग्रहण सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. एआय पॉलिसी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून लवकरच उद्योगही स्थापन होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर विदर्भातून एकही प्रकल्प गुजरातला गेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यात उद्योगभवननागपुरात जसे उद्योग भवन आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योगभवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उद्योग विभागाशी संबंधित सर्व विभाग एकाच इमारतीत येतील, असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
अॅडव्हान्टेज विदर्भमध्ये काही करार होणार आहे. उद्योगांना सोयीचे ठरावे, यादृष्टीने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन उभारणार असून, सर्व परवानग्या एका छताखाली मिळण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विभागाने एक पोर्टल सुरू केले असून कुठली फाइल कुठे अडली. याची माहिती मिळेल. उद्योगपतींना धमकावने, खंडणी मागणे, त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.