प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह; व्हीएनआयटीतील प्राध्यापकांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 07:22 IST2021-05-25T07:21:28+5:302021-05-25T07:22:32+5:30
Nagpur News व्हीएनआयटीतील प्राध्यापकांनी संशोधन केले असून, इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह विकसित केले आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विलास कळमकर यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह; व्हीएनआयटीतील प्राध्यापकांचे संशोधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वयंपाकासाठी ग्रामीण भागातील अनेक घरांत आजदेखील स्टोव्हचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हीच बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीतील प्राध्यापकांनी संशोधन केले असून, इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह विकसित केले आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विलास कळमकर यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले आहे.
व्हीएनआयटी नागपूर येथील संशोधकांनी एकूण तीन कुकस्टोव्ह मॉडेल्स विकसित केले. या संशोधन प्रक्रियेत अगोदर महाराष्ट्राच्या विविध विभागांतील खेड्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर विकसित करण्यात आलेले सर्व स्टोव्ह मॉडेल्स वापरकर्ता-केंद्रित डिझाईन पद्धतीवर आधारित आहेत. परवडणारी फॅन पॉवर असलेल्या बायोमास कुकस्टोव्हमध्ये कार्बन मोनोक्साईड आणि पार्टिक्युलेट मटेरिअल्सचे उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात आला. हे कुक स्टोव्ह घन बायोमास इंधन जळण्यास सक्षम आहेत, संशोधक आता कुकस्टोव्हच्या अंतिम उत्पादनाच्या विकासावर कार्य करीत आहेत.
या संशोधनात सेंट व्हिन्सेंट पलोट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. एम. पी. क्षीरसागर, आणि सूरत येथील एव्हीएनआयटीतील सहायक प्राध्यापक डॉ. रोहन आर. पांडे, तसेच सूरज घिवे यांचेदेखील मौलिक सहकार्य लाभले.
पारंपारिक बायोमास कूकस्टोव्हशी संबंधित घरातील वायू प्रदूषणामुळे अनेक आजार होतात. दर वर्षी जगभरात ४ दशलक्ष आजाराशी संबंधित मृत्यू वाचविण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे, अशी भूमिका व्हीएनआयटीतर्फे मांडण्यात आली आहे.