इबोलाचे रुग्ण पेर्इंग वॉर्डात!
By Admin | Updated: November 1, 2014 02:48 IST2014-11-01T02:48:50+5:302014-11-01T02:48:50+5:30
सर्वत्र दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचे थैमान भारतात होता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावर उपाययोजना म्हणून ..

इबोलाचे रुग्ण पेर्इंग वॉर्डात!
नागपूर : सर्वत्र दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचे थैमान भारतात होता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली आहे. परंतु रुग्ण आढळून आल्यास त्याच्या उपचारासाठी मेडिकलचा ‘पेर्इंग वॉर्ड’ तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
पश्चिम आॅफ्रिकेत थैमान घालणाऱ्या इबोला आजाराची व्याप्ती वाढत चालली आहे. दिवसेंदिवस जगभरात या आजाराचा धोका वाढला आहे. इबोलाला रोखण्याच्या प्रयत्नात वाढ झाली नाही तर, पुढच्या ६० दिवसात दर आठवडयाला इबोलाचे दहा हजार रु ग्ण तयार होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, नागपूरचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाला भेट घेऊन संबंधित विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विमानतळावर संक्रमण आजार नियंत्रण खोलीची पाहणी केली. यावेळी विमानतळावर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याला योग्य उपचार मिळावा यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशीही त्यांनी भेटून चर्चा केली. डॉ. जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरोग्य विभागाला कमी वेळात वेगळा ‘आयसोलेशन वॉर्ड’ तयार करणे शक्य नाही. यासाठी मेडिकलची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. नुकतेच मेडिकलच्या पेर्इंग वॉडाची पाहणी करण्यात आली.
या वॉर्डाला आयसोलेशन वॉर्डात रूपांतरित करणे शक्य असल्याचे दिसून आले. हा वॉर्ड इतर वॉर्डांपासून दूर आहे. ये-जा करण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने या वॉर्डात पाच व्हेंटिलेटर मशीन, आॅक्सिजन व सक्शन पाईपलाईनची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सुजाता सौनिक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)