प्रत्येक कर्मचाऱ्याने कामाचा लेखाजोखा तयार ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:58+5:302020-12-06T04:07:58+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेत आलेला कर्मचारी आपल्या कामकाजाच्या वेळेत काय? काम करतो. त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी तो पार पाडतो काय? ...

प्रत्येक कर्मचाऱ्याने कामाचा लेखाजोखा तयार ठेवावा
नागपूर : जिल्हा परिषदेत आलेला कर्मचारी आपल्या कामकाजाच्या वेळेत काय? काम करतो. त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी तो पार पाडतो काय? कर्मचाऱ्यांनी केलेल्या दररोजच्या कामाचा लेखाजोखा आता कर्मचाऱ्यांना ठेवावा लागणार आहे. तो कधीही तपासण्यात येणार असल्याने, कर्मचाऱ्यांनो लेखाजोखा व्यवस्थित तयार ठेवा, असे निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहे.
सरकारी काम अन् चार महिने थांब! अशी म्हण आहे. या म्हणीची अनुभूती नागरिकांना शासकीय कार्यालयात येते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांची अथवा प्रशासकीय कामे एका ठराविक वेळेत मार्गी लागावीत, यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन दिवशी किती व कोणते काम केले याचे कार्यविवरण पंजी (वर्क शीट) तयार करण्यास सांगितले आहे. जि.प. ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जनतेच्या विकासकामात अडचणी येतात. जनतेचीच नव्हे तर जि.प. कर्मचाऱ्यांचीही कामे वेळेवर होत नाही.
कर्मचारी निव्वळ त्यांच्या फायद्याच्या कामांनाच प्राधान्य देतात, अशी ओरड नेहमीच सामान्य नागरिकांकडून होत असते. त्यामुळे जि.प.सीईओ योगेश कुंभेजकर यांनी प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या आठवड्याभरातील कामकाजाची कार्यविवरण पंजी तयार करण्यास सांगितले आहे. त्यांची वर्क शिट कधीही पाहणार असल्याचेही त्यांनी विभागप्रमुखांमार्फत कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. यामुळे जि.प.चा ‘झिरो पेंडेन्सी’ चा उद्देश सफल होणार आहे.