नागपूर : वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूररेल्वे स्थानकावर ई व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जायचे म्हटले तर पुलावर चढत जावे लागते आणि नंतर परत खाली उतरावे लागते. वृद्ध नागरिक आणि दिव्यांगांसाठी हे फार त्रासदायक ठरते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर बॅटरी कार किंवा ई व्हीलचेअरची व्यवस्था करून द्यावी, अशी अनेक दिवसांपासूनच प्रवाशांची मागणी होती. ती अखेर आता पूर्ण झाली. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रोजची संख्या लक्षात घेता नागपूर रेल्वे स्थानकावर चार व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १२ मिनिटात ही चेअर एक किलोमिटर धावते. प्रवाशाला त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअरसोबत ऑपरेटरही असतो. मागणी करणाऱ्या प्रवाशाला प्रति ट्रीप १०० रुपये चार्ज घेतला जाईल. त्यावर लगेज नेण्याची सोय नसेल. छोटीशी पिशवी मात्र प्रवासी सोबत नेऊ शकतो.
फलाट क्रमांक एक वर उपलब्धही व्हीलचेअर फलाट क्रमांक एकवर असलेल्या उपस्टेशन व्यवस्थापक, वाणिज्य कार्यालयात उपलब्ध राहिल. मात्र, प्रवासी ज्या फलाटावर आहे, तेथे तो फोनवर संपर्क करून ही व्हीलचेअर बोलवून घेऊ शकतो. त्यासाठी रेल्वे स्थानकावर जागोजागी बोर्ड लावण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे, यापूर्वीची जुनी सामान्य व्हीलचेअर आणि स्ट्रेचरही येथे उपलब्ध असून, त्यासाठी मात्र प्रवाशांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.
आणखी काही स्थानकावर होणार सुविधा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई व्हीलचेअरची सुविधा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येणाऱ्या बल्लारशाह, बैतूल आणि आमला रेल्वे स्थानकावरही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.