‘ई-कचरा’ साठलाय, ‘नो टेन्शन’ !
By Admin | Updated: January 12, 2017 02:11 IST2017-01-12T02:11:26+5:302017-01-12T02:11:26+5:30
भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणाऱ्या ‘ई-कचऱ्या’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे.

‘ई-कचरा’ साठलाय, ‘नो टेन्शन’ !
संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार संकलन : मैत्री परिवार, नागपूर मनपा व संघाचा संयुक्त उपक्रम
नागपूर : भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणाऱ्या ‘ई-कचऱ्या’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणाऱ्या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे. हीच बाब लक्षात ठेवून मैत्री परिवार, नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून १५ जानेवारी रोजी उपराजधानीत ‘ई-कचरामुक्त नागपूर’ या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी ‘ई-कचरा’ संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.
मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, प्रा.विजय शहाकार, मकरंद पांढरीपांडे, विष्णू मनोहर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण वर्षभर ही समस्या सोडविण्यासाठी जनजागृती व कृतिकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.
संपूर्ण शहरात विविध ‘झोन’निहाय संकलन केंद्र उभारण्यात येतील. नागपूर मनपानेदेखील ई-कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. (प्रतिनिधी)