डिस्लेक्सियाग्रस्तांना कधी मिळणार दिलासा ?
By Admin | Updated: March 6, 2017 01:50 IST2017-03-06T01:50:56+5:302017-03-06T01:50:56+5:30
‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो.

डिस्लेक्सियाग्रस्तांना कधी मिळणार दिलासा ?
प्रमाणपत्रासाठी मुंबई-पुण्याच्या चकरा : तंत्रज्ञअभावी मेडिकलचे केंद्र खोळंबले
सुमेध वाघमारे नागपूर
‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु हा आजार असल्याचे प्रमाणपत्र राज्यात केवळ पुणे व मुंबई येथील अध्ययन अक्षमता केंद्रात मिळायचे. परिणामी, प्रमाणपत्राअभावी अशी मुले मागे पडायची. याला घेऊन दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. मेडिकलमध्ये हे केंद्र सुरू झाले, मात्र तंत्रज्ञाची जागाच भरण्यात आली नाही. परिणामी, प्रमाणपत्रासाठी रुग्णांची पुणे, मुंबईवारी सुरूच आहे.
‘डिस्लेक्सिया’ हा शब्द आमीर खान यांच्या ‘तारे जमीपर’ या चित्रपटातून लोकांसमोर आला. अनेकांना या विकाराची माहिती झाली. ‘डिस्लेक्शिया’ बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षरओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी आणि त्याच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे काहीही लिहिताना तो वेगवेगळ्या असंख्य चुका करतो. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. वर्गात तो ‘ढ’ किंवा मूर्ख समजला जातो. हा विकार वेळीच ओळखता आल्यास व त्याला तज्ज्ञाकडून ट्रेनिंग दिल्यास या विकारांची मुले आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचे धनी होऊ शकतात. या आजाराच्या रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. परंतु याचा फायदा पुणे, मुंबईच्याच रुग्णांना मिळत आहे. कारण या ठिकाणच्या इस्पितळातच ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू आहे. येथेच रुग्णांची चार ते पाच वेळा तपासणी करून हा आजार असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. याला घेऊन २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. १ फेब्रुवारी २०१६ मध्ये यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसिक रोग विभागात हे केंद्र सुरू झाले. परंतु मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षक (स्पेशल एज्युकेटर) हे दोन तंत्रज्ञ न मिळाल्याने या केंद्रातून प्रमाणपत्र देणे बंदच आहे.
२५ विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतर केंद्र झाले बंद
सूत्रानुसार, मेडिकलमध्ये आॅक्टोबर-२०१६ मध्ये ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू झाले. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेमक्या चुका माहिती करून घेण्यासाठी मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षकाचे पदच भरण्यात आले नाहीत. यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही मंजुरी न मिळाल्याने आता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईचा रस्ता दाखविला जात आहे.