समुद्रावर स्वार होऊन बजावतो कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:56 IST2017-07-20T01:56:20+5:302017-07-20T01:56:20+5:30
सामान्य माणूस कुटुंबापासून एक दिवसभर दूर राहिला तरी त्याला हुरहुर होते.

समुद्रावर स्वार होऊन बजावतो कर्तव्य
मर्चंट नेव्ही आॅफिसर्स वेलफेअर असोसिएशन : समाजाने बघण्याचा दृष्टिकोन बदलावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य माणूस कुटुंबापासून एक दिवसभर दूर राहिला तरी त्याला हुरहुर होते. सूर्यास्त होताच त्याला घराची ओढ लागते. मात्र ‘मर्चंट नेव्ही’चे अधिकारी तब्बल सहा-सहा महिने घर, परिवार आणि शहरापासून दूर राहतात. आपले कर्तव्य बजावतात. या काळात त्यांच्यासोबत असतो तो केवळ अथांग समुद्र आणि उंच उसळणाऱ्या लाटा. कोणत्याही देशाच्या विकासात या ‘मर्चंट नेव्ही’चे अनन्यसाधारण महत्त्व असते. केवळ आपल्या देशाचा विचार करता, येथील एकूण माल वाहतुकीच्या ९० टक्के भार ‘मर्चंट नेव्ही’ उचलते. देश-विदेशातील माल सुरक्षित स्थळी पोहोचविते. मात्र असे असताना या ‘मर्चंट नेव्ही’विषयी समाजात फार मोठे गैरसमज पसरले आहेत. ‘मर्चंट नेव्ही’मधील अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे व्यसनी. व्यभिचारी अशा नजरेने समाज त्यांच्याकडे पाहतो. मात्र असे काहीही नसून‘मर्चंट नेव्ही’एक शिस्तप्रिय क्षेत्र आहे; शिवाय यात काम करणारा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी हा कठोर परिश्रमी असतो. त्यामुळे समाजाने या क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन मर्चंट नेव्ही आॅफिसर्स वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ व्यासपीठाच्या मंचावर चर्चा करताना केले. या चर्चेत ‘मर्चंट नेव्ही आॅफिसर्स वेलफेअर असोसिएशन’चे अध्यक्ष संजय म्हैसने, उपाध्यक्ष कॅप्टन अजित करपटे, सचिव हेमंत गतफणे, उपाध्यक्ष प्रशांत खाडिलकर, कोषाध्यक्ष अर्पण कटकवार, सहकोषाध्यक्ष अमित लोखंडे, सहसचिव स्वप्निल खाडिलकर, कॅप्टन सुशील नंदनवार, सदस्य धनंजय शेरके, अनिकेत जगताप, वैभव मुसळे, योगेश करकरे व वैभव कर्दळे यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, ही संघटना ‘मर्चंट नेव्ही’अधिकाऱ्यांची देशातील पहिली संघटना आहे. या संघटनेचा उद्देश हा मोर्चे काढून धरणे-आंदोलने करणे मुळीच नाही. ही संघटना मुळात एक कौटुुंबिक आणि सामाजिक जाणिवेतून तयार करण्यात आली आहे. ‘मर्चंट नेव्ही’तील अधिकारी हा सहा-सहा महिने आपल्या कुटुंबापासून दूर असतो. अशास्थितीत त्याच्या कुटुंबाला कुणाचा तरी सहारा असावा. त्यांचे शहरात कुणी तरी आहे, अशी त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना असावी, या हेतूने ही संघटना तयार करण्यात आली आहे. सध्या या संघटनेत एकूण १०० सदस्य आहेत. मात्र भविष्यात संघटनेच्या देशभरात शाखा सुरू करण्याचा मानस यावेळी संघटनेचे अध्यक्ष म्हैसने यांनी व्यक्त केला.
‘मर्चंट नेव्ही’ आव्हानात्मक
‘मर्चंट नेव्ही’ मधील अधिकारी व कर्मचाऱ्याला संपूर्ण जग फिरण्याची संधी मिळते. तो जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशात जातो. यासाठी त्याला सोयी-सुविधा आणि पैसासुद्धा मिळतो. मात्र तेवढेच कठोर परिश्रमसुद्धा घ्यावे लागतात. जहाजातील कोट्यवधीचा माल हा एका निश्चित वेळेत ठराविक ठिकाणी पोहचविणे, त्याची प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे हे क्षेत्र जेवढे विलोभनीय आहे, तेवढेच आव्हानात्मकसुद्धा असल्याचे यावेळी संघटनेचे सचिव हेमंत गतफणे यांनी सांगितले. ते म्हणाले, तरुणांनी निश्चितच या क्षेत्रात आले पाहिजे. येथे भरपूर पैसा आहे. सोयी-सुविधा आहे. शिवाय एक शिस्तप्रिय जीवन पद्घती असल्याचेही त्यांनी सांगितले.
फसवेगिरीपासून सावधान
सध्या ‘मर्चंट नेव्ही’च्या नावाखाली तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी लुटले जात आहे. मात्र तरुणांनी अशा फसव्या संस्था आणि जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहन यावेळी कॅप्टन अजित करपटे यांनी केले. ते म्हणाले, समाजात ‘मर्चंट नेव्ही’चा अभ्यासक्रम चालविणाऱ्या अनेक बोगस संस्था आहेत. त्यामुळे तरुणांनी अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी सखोल शहानिशा करावी. अनेक जण तरुणांना लठ्ठ पगाराचे आमिष दाखवितात, शिवाय त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन चुकीच्या जहाजावर पाठवितात. अशा चुकीच्या जहाजावर गेल्यामुळे अनेकदा त्या तरुणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘मर्चंट नेव्ही’क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी कोणत्याही खोट्या प्रलोभनांना बळी न पडता, सखोल शाहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. तरुणांची ही गरज लक्षात घेऊन मर्चंट नेव्ही आॅफिसर्स वेलफेअर असोसिएशनने अशा तरुणांसाठी नि:शुल्क मार्गदर्शनाची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे बी-६ अखिल भारतीय कुणबी समाज भवन, सक्करदरा रोड, महाल येथे कार्यालय सुरू करण्यात आले असून, ते रोज दुपारी १ ते सायं. ५ वाजतापर्यंत सुरू राहणार आहे. तरी तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
सामाजिक उपक्रमातही पुढाकार
मर्चंट नेव्ही आॅफिसर्स वेलफेअर असोसिएशन सामाजिक दायित्व म्हणून पुढील काही दिवसांत विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबविणार आहेत. यात शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित करून, तरुणांना ‘मर्चंट नेव्ही’ विषयी माहिती दिली जाईल. शिवाय संघटनेतील सदस्यांनी एक निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून भविष्यात संघटनेतील कोणत्याही पदाधिकारी अथवा सदस्याच्या परिवाराला गरज भासल्यास त्यातून मदत केली जाईल, असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय तरुणांसाठी ‘पोस्ट-सी’ कोर्सेस सुरू करण्याचीसुद्धा योजना आखण्यात आली आहे. ‘मर्चंट नेव्ही’ मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना या संघटनेची फार मोठी मदत होणार आहे. संघटनेच्या माध्यमातून तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळेल, शिवाय कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा आणि कुठे घेऊ नये, याची योग्य माहिती मिळेल. संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी या क्षेत्रात असल्याने त्यांना कोणती संस्था मान्यताप्राप्त आहे आणि कोणती बोगस आहे. याविषयी उत्तम माहिती असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘मर्चंट नेव्ही’मध्ये रोजगाराच्या संधी
तरुणांसाठी ‘मर्चंट नेव्ही’ क्षेत्रात भरपूर संधी आहेत. शिवाय पगारही चांगला मिळतो. मात्र प्रवेश करताना आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. सध्या देशातील ‘मर्चंट नेव्ही’मध्ये तब्बल ५० लाख नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. समुद्राच्या मार्गाने होणारी माल वाहतूक ही इतर साधनांच्या तुलनेत फारच स्वस्त असते. त्यामुळेच ‘मर्चंट नेव्ही’चे दिवसेंदिवस फार महत्त्व वाढत आहे. विशेष म्हणजे, इतर माल वाहतूक साधनांच्या तुलनेत जहाजाला फार कमी इंधन लागते. शिवाय मनुष्यबळही कमी लागते. एका मालवाहू जहाजावर कॅप्टनसह केवळ २० ते २५ अधिकारी व कर्मचारी असतात. मात्र ते सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्येक स्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम असतात. ते प्रत्येक परिस्थितीशी लढण्यासाठी सज्ज असतात. अलीकडे तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली असून, त्याचा ‘मर्चंट नेव्ही’ला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे मर्चंट नेव्ही क्षेत्र आता फार सुरक्षित झाले आहे.