कारागृहात गेलेले दोघे पुन्हा धंतोली पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 27, 2015 02:52 IST2015-05-27T02:52:31+5:302015-05-27T02:52:31+5:30
जेल ब्रेक प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी धंतोली पोलिसांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन ...

कारागृहात गेलेले दोघे पुन्हा धंतोली पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : जेल ब्रेक प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी धंतोली पोलिसांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन त्यांचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.सी. गवई यांच्या न्यायालयातून ३० मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. याच प्रकरणातील अन्य एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
मोहम्मद सोहेबखान ऊर्फ शिब्बू सलीमखान (२५) रा. न्यू मानकापूर, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (२१) रा. नवलप्राशी नेपाळ, अशी पोलीस कोठडी रिमांड मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर, असे न्यायालयीन कोठडी रिमांड झालेल्या आरोपीचे नाव आहे.
शिबू, नेपाली आणि अरमान हे तिघे बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगण्याच्या प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत होते. त्यांची पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने त्यांना काल सोमवारी न्यायालयाच्या आदेशावरून कारागृहात रवाना करण्यात आले होते. धंतोली पोलिसांनी कारागृहातून पळून जाण्याच्या प्रकरणात शिबू आणि नेपाली यांना आज रीतसर अटक केली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक के.एम. गड्डिमे यांनी या दोघांना न्यायालयात हजर करून ३१ मेपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला. हेड कॉन्स्टेबल संजय प्रधान यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)