राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST2021-06-10T04:07:25+5:302021-06-10T04:07:25+5:30
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या अगोदर नगरसेवक दुनेश्वर पेठे यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. अनिल अहिरकर ...

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या अगोदर नगरसेवक दुनेश्वर पेठे यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. अनिल अहिरकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासंदर्भात लॉबिंग वाढली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पेठे यांना ३ जून रोजी तयार झालेले नियुक्ती पत्र सोपविले. याचाच अर्थ पेठे यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा सोपविण्याचा निर्णय अगोदरच झाला होता.
अहिरकर यांनी मागील आठवड्यात मुंबईला जाऊन प्रदेशाध्यक्षांना राजीनामा सोपविला होता. यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षाकडून त्याच दिवशी पेठे यांच्या नावाची घोषणा होणार होती, मात्र ते शक्य झाले नाही. यादरम्यान पक्षात इतर दावेदारदेखील समोर आले. प्रदेशाध्यक्षांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांना नियुक्तीपत्र देऊन लॉबिंगवर ब्रेक लावला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत पवार उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येईल. पक्ष मनपा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, अशी भावना पेठे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पेठे यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.