बाबा डोंगरेंना हायकोर्टाचा दणका
By Admin | Updated: July 7, 2015 02:30 IST2015-07-07T02:30:18+5:302015-07-07T02:30:18+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून दाखल एफआयआर रद्द करण्याची तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाबा भगवान डोंगरे..

बाबा डोंगरेंना हायकोर्टाचा दणका
सहायक पोलीस आयुक्त : एफआयआर रद्द करण्यास नकार
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून दाखल एफआयआर रद्द करण्याची तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाबा भगवान डोंगरे (५५) यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. या निर्णयामुळे डोंगरे यांना जोरदार दणका बसल्याचे बोलले जात आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांनी हा निर्णय दिला. याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीव जैन व तपास अधिकारी शुभांगी देशमुख हे न्यायालयात उपस्थित होते. विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी डोंगरे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), १३(२) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. मनोजकुमार कृपाशंकर सिंह यांनी डोंगरे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, कोराडी रोडवरील गुलमोहर कॉम्प्लेक्स येथे सिंह यांचा बार व सिक्युरिटी एजन्सीचे कार्यालय आहे. याच कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करणारे डॉ. अतुल विद्यार्थी यांच्यासोबत सिंह यांचा पार्किंगवरून वाद सुरू होता. यासंदर्भात सिंह यांनी दोन-तीनदा कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली पण, काहीच कारवाई करण्यात आली नाही. परंतु, विद्यार्थी यांनी एकदाच तक्रार केल्यानंतर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची फाईल सहायक पोलीस आयुक्त कार्यालय पाचपावलीकडे पाठविण्यात आली होती. त्यावेळी या कार्यालयात डोंगरे हे सहायक पोलीस आयुक्त होते. डोंगरे यांनी सिंह यांना विविध प्रकारची भीती दाखवून सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली. सिंह यांनी डोंगरे यांच्या सूचनेप्रमाणे एका पोलीस कर्मचाऱ्याला ही रक्कम दिली. यानंतर डोंगरे यांनी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. सिंह यांना पैसे द्यायचे नव्हते. यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. यावरून गेल्या १७ फेब्रुवारी रोजी मानकापूर येथे रचण्यात आलेला सापळा अपयशी ठरला. यानंतर २१ फेब्रुवारी रोजी डोंगरे यांच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला.
यावेळी डोंगरे यांना १० हजार रुपयांच्या लाचेसह अटक करण्यात आली. उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी प्रकरणातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांकडे लक्ष वेधले. न्यायालयाने त्यांचे काही मुद्दे ग्राह्य धरून डोंगरे यांची याचिका खारीज केली.(प्रतिनिधी)