दरोड्याच्या तयारीतील गुंड जेरबंद
By Admin | Updated: January 4, 2017 02:11 IST2017-01-04T02:11:58+5:302017-01-04T02:11:58+5:30
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन सशस्त्र गुंडांना इमामवाडा पोलिसांनी जेरबंद केले.

दरोड्याच्या तयारीतील गुंड जेरबंद
नागपूर : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन सशस्त्र गुंडांना इमामवाडा पोलिसांनी जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी मात्र पळून गेले.
इमामवाड्यातील जाटतरोडी भागात रेल्वे कॅबिनकडे जाणाऱ्या ठिकाणी काही गुंड शस्त्र घेऊन दरोड्याच्या तयारीत बसून आहे, अशी माहिती सोमवारी रात्री ११.३० वाजता इमामवाडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे अभिजित ऊर्फ सुनील अजय पाहुणे (वय १९, रा. रामबाग), हर्षद सुरेश फुले (वय १९, रा. अशोका बुद्धविहाराजवळ) तसेच समीर पुरुषोत्तम पाटील (वय २६, रा. रामबाग, नागपूर) हे गुंड पोलिसांच्या हाती लागले. सूरज गोपाल पाटील आणि मयूर लोखंडे (दोघेही रा. रामबाग) हे दोघे मात्र पळून गेले.
पोलिसांनी पकडलेल्या गुंडांकडून तलवार, मिरची पावडर, दोरी आणि यामाहा मोटरसायकल (एमएच ३१/ एफ २६८३) जप्त केली. फरार झालेल्या पाटील आणि लोखंडेचा पोलीस शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)