व्हीव्हीपॅटमुळे मतदान अधिक पारदर्शक : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:38 IST2019-03-30T23:32:44+5:302019-03-30T23:38:54+5:30
मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. मतदारांना आपल्या मतासंदर्भात ७ सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी दिली.

निवडणुक तयारीसंदर्भात वनामती येथे संपादकांशी संवाद साधतांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. साबेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी एस., उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजलक्ष्मी शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. मतदारांना आपल्या मतासंदर्भात ७ सेकंदापर्यंत पाहण्याची सुविधा व्हीव्हीपॅटमुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी दिली.
वनामती येथे आयोजित केलेल्या माध्यम संवाद कार्यक्रमात संपादकांशी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, रामटेक लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी एस., उपनिवडणूक निर्णय अधिकारी राजलक्ष्मी शहा, तहसीलदार प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यात व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर करण्यात येत असून, दोन्ही उपकरणांमध्ये तंत्रज्ञान, तांत्रिक सुरक्षितता आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून होणारा सुरक्षित वापर, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली. ही उपकरणे कोणत्याही इतर उपकरणांना जोडता येत नाहीत. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अत्यंत सुरक्षित आहे. यामध्ये कुणालाही हस्तक्षेप वा छेडछाड करता येत नाही तसेच व्हीव्हीपॅटला कुणीही हॅक करू शकत नाही. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराने केलेले मतदान प्रत्यक्ष स्क्रीनवर ७ सेकंदपर्यंत पाहण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी संपादकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक मतदान करण्याचा अनुभव घेतला. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.