कारवाईच्या धाकामुळे सूत्रधाराची धावपळ
By Admin | Updated: December 16, 2015 03:23 IST2015-12-16T03:23:22+5:302015-12-16T03:23:22+5:30
लोकमतच्या वृत्ताने सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा करणाऱ्या रॅकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

कारवाईच्या धाकामुळे सूत्रधाराची धावपळ
सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा : अनेकांच्या भेटीगाठी
नागपूर : लोकमतच्या वृत्ताने सडक्या सुपारीचा जीवघेणा धंदा करणाऱ्या रॅकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कारवाईचे संकेत मिळताच मंगळवारी दिवसभर या रॅकेटच्या सूत्रधाराने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. काहींना ‘लाखोंची स्नेहभेट’ दिली. त्याबदल्यात एका अधिकाऱ्याने रॅकेटच्या सूत्रधाराला काही दिवस धंदा बंद ठेवण्याचा सल्ला दिल्याची आतल्या गोटातील माहिती आहे.
कॅन्सरसारख्या भयावह रोगाच्या जबड्यात लोटणाऱ्या सडक्या सुपारीची बिनबोभाट विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार उपराजधानीत सर्रास सुरू असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी आणि मंगळवारी ठळकपणे प्रकाशित केले. या वृत्ताने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या रॅकेटचा सूत्रधार कुख्यात चिंटू तसेच त्याचे साथीदारही हादरले आहे. आपले पाप उघड झाल्यामुळे महाराजही धावपळ करीत आहे. या रॅकेटकडून महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता घेणारा अधिकारी तसेच नोटांची खेप पोहोचविणाऱ्या पोलिसाकडे चिंटूसह साथीदारांनी धाव घेतली. एका नेत्याने त्यांना हाकलून लावल्याचीही माहिती आहे.
कारवाई होण्याची दाट शक्यता लक्षात आल्यामुळे या टोळीने दुपारपासून अनेकांना लाखोंची ‘भेट’ देऊन सांभाळून घेण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या यंत्रणेतील एकाने त्यांना आमच्यावर दडपण आले आहे. काही दिवस हा धंदा बंद ठेवा, असा सल्ला दिल्याचेही समजते. (प्रतिनिधी)
डीसीपीची गोदामावर धडक
या प्रकरणात आज पुन्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांची रात्रपाळी (नाईट राऊंड) होती. त्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्धमाननगरातील एका गोदामात शेकडो पोती सडलेली सुपारी दडवली असून, ती आता बाहेरच्या प्रांतात पाठविली जाणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे डीसीपी शर्मा यांनी प्रारंभी आपले पथक तेथे पाठवले, नंतर स्वत: ते तेथे पोहोचले. त्यांनी सडक्या सुपारीची शेकडो पोती बघितली. त्यानंतर योग्य कारवाईचे आदेश देत पहाटे ते घटनास्थळावरून निघून गेले.
औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद
डीसीपींच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गोदामात बोलवून घेतले. त्यांनी येथील सुपारीचे ‘नमुने’ घेतले. त्यानंतर तपासणीच्या नावाआड हे प्रकरण दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची संबंधित वर्तुळात चर्चा पसरली. चांगल्या सुपारीतून बाहेर काढलेली ही (सडकी) सुपारी असून, ती संबंधित व्यापारी फेकून देणार होता, असा अहवाल दिला जातो की काय, अशीही शंका व्यक्त केली जाऊ लागली. उपराजधानीत विस्तारलेल्या या जीवघेण्या धंद्याच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाने आतापावेतो गप्पपणाची भूमिका घेतल्यामुळे हे प्रशासनही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या विभागाचा एक अधिकारी संपूर्ण विभागात आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचमुळे आता प्रशासनाचे वरिष्ठ कोणती भूमिका स्वीकारतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.