देखभाल नसल्याने सीताबर्डी रस्त्याची दुर्दशा
By Admin | Updated: November 10, 2015 03:30 IST2015-11-10T03:30:58+5:302015-11-10T03:30:58+5:30
उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे.

देखभाल नसल्याने सीताबर्डी रस्त्याची दुर्दशा
वाहनधारक त्रस्त : सहा महिन्यानंतर सुरू होणार काम
नागपूर : उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झिरो माईल ते कन्हान दरम्यानच्या महामार्ग सिमंन्ट क्राँक्रिटचा करणार आहे. परंतु या कामाला सुरुवात होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
इतर शहरातून नागपुरात येणारे बहुसंख्य लोक सीताबर्डी येथे खरेदीसाठी येतात, तसेच येथून महामार्ग गेला असल्याने या मार्गावरून वाहनांची ये-जा असते. सीताबर्डी हा भाग महत्त्वाचा असूनही येथील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे इतर शहरातून नागपुरात खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात नागपूर शहराविषयी वाईट प्रतिमा निर्माण होते. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. झिरो माईल ते सीताबर्डी पोलीस स्टेशन या दरम्यानचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरील मार्ग काठाने उखडला आहे. महापालिकेतर्फे या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. या मार्गावर खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)