गुरूमुळे ज्ञान व धर्मामुळे चारित्र्य निर्माण होते
By Admin | Updated: July 24, 2015 02:53 IST2015-07-24T02:53:33+5:302015-07-24T02:53:33+5:30
जैन संत आचार्य पूर्णचंद्र सूरीश्वरजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा

गुरूमुळे ज्ञान व धर्मामुळे चारित्र्य निर्माण होते
नागपूर : जैन संत अध्यात्मयोगी आचार्यदेव श्रीमद् विजय कलापूर्णसुरीश्वरजी म.सा. यांचे शिष्य आचार्य श्रीमद् विजय पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांचा चातुर्मास समारोह वर्धमाननगर येथील संभवनाथ जैन मंदिरात सुरू आहे. चातुर्मासाच्या आरंभालाच आचार्य श्री यांचा ५५ वा जन्मदिवस असल्याने शिष्य व श्रावकांनी त्यांचा जन्मदिन गुरुभक्ती व श्रद्धेने साजरा केला.
श्री संभवनाथ जैन मंदिर परिसरातील आराधना भवनात जन्मदिनानिमित्त ‘अष्टपरिहार्य वंदना’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आचार्यश्री श्रावकांना संबोधित करताना म्हणाले की, भगवान अरिहंतांनी आपल्यावर मोठे उपकार केले आहे. सृष्टीचा निर्माता कसा आहे, ध्यानातून याची कल्पना आपल्याला येते. सृष्टीत देव, गुरू, धर्म हे तीन तत्त्व आहेत. गुरूमुळे ज्ञान व धर्मामुळे चारित्र्य निर्माण होते. मानव जन्म दुर्लभ आहे. मानव जन्माला सार्थक बनविण्यासाठी धर्माची आराधना करून आपण आपली आत्मा पवित्र करू शकतो.
यावेळी मोठ्या संख्येने श्रावक उपस्थित होते. कीर्तीभाई वोरा यांनी गुरुभक्तीवर अतिशय सुंदर गीत सादर केले. गिरधारीलाल कोचर यांनी आचार्यश्रींना गुरू श्रीमद् विजय कलापूर्णरत्न सुरीश्वरजी म.सा. यांची प्रतिमा भेट दिली. पूर्णरक्षित विजयजी म्हणाले की, बालपण अतिशय आनंदी असते. बालकांमध्ये तीन गुण असतात. हे तीनही गुण आमचे गुरुदेव यांच्यात आहेत. यावेळी ‘वन मिनिट सरप्राईज गेम’ आयोजित करण्यात आला होता. संघपूजन करण्यात आले. हेतलबेन व सहकाऱ्यांनी कलात्मक गहुली बनविली होती. (प्रतिनिधी)