वन विभागाच्या चौकशीला मध्यवर्ती संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची हुलकावणी
By Admin | Updated: July 17, 2014 01:01 IST2014-07-17T01:01:19+5:302014-07-17T01:01:19+5:30
मध्यवर्ती संग्रहालयातील अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे मंगळवारी चौकशीसाठी गेलेल्या वन विभागाच्या समितीला खाली हात परतावे लागले. माहिती सूत्रानुसार, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक

वन विभागाच्या चौकशीला मध्यवर्ती संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची हुलकावणी
अभिरक्षकांचे असहकार्य : चौकशी समिती खाली हात परतली
नागपूर : मध्यवर्ती संग्रहालयातील अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे मंगळवारी चौकशीसाठी गेलेल्या वन विभागाच्या समितीला खाली हात परतावे लागले. माहिती सूत्रानुसार, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक बी. एच. वीरसेन यांच्या नेतृत्वात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चौकशी समिती मध्यवर्ती संग्रहालयात दाखल झाली. परंतु यावेळी कार्यालयात उपस्थित शिपायाने साहेब (संग्रहालयाचे अभिरक्षक) कार्यालयात हजर नसल्याचे सांगितले. त्यावर समितीच्या सदस्यांनी कुठे गेल्याची विचारणा केली असता, ते शेजारच्या पुरातत्त्व विभागात असल्याचे सांगण्यात आले. त्यावर संग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने दूरध्वनीवरून अभिरक्षक कठाणे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना वन विभागाच्या चौकशी समितीची माहिती दिली. त्यावर कठाणे यांनी ४.३० वाजतापर्यंत कार्यालयात पोहोचणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वन विभागाची समिती तब्बल दोन तास साहेबांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसून राहिली. शेवटी ४.४५ वाजले, तरी साहेब कार्यालयात पोहोचले नाही. त्यामुळे अखेर एसीएफ वीरसेन यांनी स्वत: कठाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, चौकशीत सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु कठाणे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती संग्रहालयाच्या संचालकांशी चर्चा केल्याशिवाय चौकशीची परवानगी देणार नसल्याचे सांगितले. त्यावर वीरसेन यांनी संग्रहालय प्रशासनाला अगोदरच चौकशीची नोटीस बजावून पूर्वसूचना दिली असल्याची कठाणे यांना आठवण करून दिली. मात्र कठाणे मुळातच सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी सायं. ५.१५ वाजताच्या सुमारास वन विभागाची समिती खाली हात संग्रहालयाबाहेर पडली. यानंतर समितीने दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा अहवाल तयार करून, तो मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षकांकडे सादर केला असल्याची माहिती समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वन्यप्राण्यांच्या ‘ट्रॉफी’ नष्ट
‘सृष्टी’ संस्थेचे सदस्य विनीत अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात मध्यवर्ती संग्रहालयाकडून मिळविलेल्या दस्तऐवजातून संग्रहालयातील चार अस्वल, एक वाघ, दोन सांबर, दोन नीलगाई, तीन काळवीट, दोन भेडकी, दोन बिबट, दोन जंगली मांजर, चार जंगली ससे, एक फार्इंग फॉक्स, पाच मुंगूस, दोन रानम्हशी, एक खार व एक माकड अशा विविध वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी नष्ट करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे प्रकरण वन विभागापर्यंत पोहोचताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३ जुलै रोजी मुख्य वनसंरक्षकांना एक पत्र जारी करून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले होते. त्यावर उपवनसंरक्षकांनी एसीएफ वीरसेन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून ही कारवाई सुरू केली आहे.