उत्सवावर डेंग्यू, स्वाईन फ्लूचे सावट

By Admin | Updated: September 18, 2015 02:49 IST2015-09-18T02:49:28+5:302015-09-18T02:49:28+5:30

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना, शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण दिसून येऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Due to festive dengue, swine flu | उत्सवावर डेंग्यू, स्वाईन फ्लूचे सावट

उत्सवावर डेंग्यू, स्वाईन फ्लूचे सावट

आतापर्यंत २७ रुग्ण आढळले
नागपूर : गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना, शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण दिसून येऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आॅगस्ट महिन्यात महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ३ हजार ६४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. जानेवारी ते आतापर्यंत २७ रुग्ण आढळून आले आहेत, तर स्वाईन फ्लूची लागण झालेले ३३१ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे.
शहरात १३०० सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी गणपतीची स्थापना केली आहे. या उत्सवानिमित्त भाविक एकत्र येत आहेत, काही ठिकाणी मोठी गर्दी उसळत आहे. यामुळे स्वाईन फ्लू पसरण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय आज झालेल्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे डेंग्यूही पसरण्याची भीती वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीतच या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. असे असतानाही, या वर्षी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याची माहिती अद्यापही सामोर आलेली नाही. धक्कादायक म्हणजे, कोणी अधिकारी या विषयी बोलायला तयार नाही. (प्रतिनिधी)
गर्दीत जाणे टाळा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. हस्तांदोलन टाळा. शक्य तोपर्यंत तोंडावर मास्क किंवा रु माल बांधावा. प्रत्येक दोन तासांनी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. गर्भवती महिला, लहान मुले, मधुमेह व रक्तदाब असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी.
डेंग्यूचे २७ रुग्ण पॉझिटिव्ह
डेंग्यूच्या रोगाने गेल्या वर्षी नागपुरात तब्बल ६०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३८५ रुग्णांची नोंद झाली होती. तर या वर्षी जानेवारीमध्ये दोन, एप्रिलमध्ये एक, मेमध्ये दोन, जूनमध्ये एक, जुलैमध्ये नऊ तर आॅगस्ट महिन्यात १२ रुग्ण, असे एकूण आतापर्यंत २७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रुग्ण संख्या फार कमी आहे. परंतु गेल्या वर्षीच्या सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. यामुळे महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
सहा महिन्यात स्वाईन फ्लूमुळे १२८ जणांचा मृत्यू
नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४ वर गेली होती. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३ मध्ये २८, २०१४मध्ये १० तर आॅगस्ट २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२८ वर पोहचली. सप्टेंबर महिन्यात शहरात चार रुग्ण पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Due to festive dengue, swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.