बेसमेंटच्या पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:17 IST2017-07-20T01:17:15+5:302017-07-20T01:17:15+5:30

धरमपेठ परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला.

Due to drowning in basement water, the death of the woman | बेसमेंटच्या पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

बेसमेंटच्या पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

धरमपेठ येथील घटना : निर्माणाधीन इमारतीत दीड महिन्यांपासून राहत होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला व त्यांनी पंचनामा करून महिलेचे शव पोस्टमार्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविले.

मृत महिलेचे नाव किसनीया कुर्वे (३५ ते ४० वर्षे) असून ती मध्य प्रदेशच्या बोथिया, जिल्हा सिवनी येथील रहिवासी होती. धरमपेठ परिसरातील ट्रॅफिक पार्कच्या मागे इम्प्रेसा सेन्ट्रल कन्स्ट्रक्शनच्या सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही महिला एका लेबर कंत्राटदाराकडे गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून मजूर म्हणून कामाला होती व गेल्या दीड महिन्यांपासून याच निर्माणाधीन इमारतीमध्ये वास्तव्यास होती. किसनीयासोबत मध्य प्रदेशातीलच एक पूजा मरावी नामक महिलाही राहत होती. दिवसा काम केल्यानंतर हे मजूर रात्री या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत झोपायचे. पहिला माळ््यावर या दोन महिला तर वरच्या माळ््यावर पुरुष मजूर झोपायचे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री जेवण करून

१० वाजताच्या दरम्यान या महिला झोपी गेल्या. सकाळी मात्र किसनीया जागेवर आढळली नाही. शोधाशोध केली तेव्हा तिची साडी बेसमेंटमधील खड्ड्यात तरंगतांना आढळली. मजुरांनी साईट इंजिनिअर रवी रहांगडाले यांना याबाबत सूचना केली. त्यानंतर रहांगडाले यांनी सीताबर्डी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा आसपास देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ही महिला दारू पित असल्याची माहिती मजुरांकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचे शव बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. सीताबर्डी पोलीस तपास करीत आहेत.

रात्रीच्या वेळी पडल्याचा संशय
रात्री १० वाजता जेवण करून झोपी गेल्याचे सोबत राहणाऱ्या पूजा मरावी या महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर कदाचित काही कामासाठी उठली असता तोल जाऊन किसनीया खाली पडल्याचा आणि बेसमेंटमध्ये जखमी झाल्यामुळे पाण्यात बुडूनच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट येईपर्यंत काही अधिकृत सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

बेसमेंटमध्ये चार फूट पाणी
धरमपेठच्या या निर्माणाधीन इमारतीमध्ये १५ बाय १० मीटरच्या बेसमेंटमध्ये साडेतीन ते चार फूट पाणी साचले आहे. शिवाय बांधकामाच्या सळाका बाहेर आल्या आहेत. वर राहणाऱ्या मजुरांसाठी सुरक्षेची व्यवस्था नाही. त्यामुळे तोल जाऊन खाली पडल्यास सळाकांमुळे जखमी होण्याची आणि पाण्यातच बुडून मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलेसोबतही असाच प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींच्या बेसमेंटमध्ये नेहमीच पाणी साचून राहते व मजुरांसोबत इतरांसाठीही धोकादायक ठरते. याकडे लक्ष देण्याची आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Due to drowning in basement water, the death of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.