नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इटारसी-नागपूर सेक्शनमधील घोराडोंगरी स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री एक मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे ओएचई तारेचा विद्युत पुरवठा बंद झाला. यामुळे दक्षिण-उत्तर मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन अनेक रेल्वेगाड्या ४ ते १३ तास उशिराने धावत आहेत. घोराडोंगरी स्टेशनजवळ मध्य प्रदेश विद्युत बोर्डाचा सारणी पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊसमध्ये कोळसा घेऊन गेलेली मालगाडी अनियंत्रित होऊन या मालगाडीचे वॅगन ओएचई तारेच्या खांबावर कोसळले. त्यामुळे इटारसी-नागपूर या मार्गावरील रेल्वेगाड्यांना होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ओएचई पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धस्तरावर कार्य सुरू केले. यासाठी एकूण २०० कर्मचारी रात्री १० वाजेपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लावण्यात आले. दरम्यान, उशिराने येणार्या रेल्वेगाड्यांची माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. (प्रतिनिधी)
मालगाडी घसरल्याने ‘ओएचई’ तारेचा वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: May 11, 2014 01:28 IST