वाळलेला कचरा आठवड्यातून दोन दिवसच गोळा करणार

By Admin | Updated: June 4, 2017 01:43 IST2017-06-04T01:43:16+5:302017-06-04T01:43:16+5:30

शहरात ५ जूनपासून ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार आहे.

The dry garbage will be collected for two days a week | वाळलेला कचरा आठवड्यातून दोन दिवसच गोळा करणार

वाळलेला कचरा आठवड्यातून दोन दिवसच गोळा करणार

ओला कचऱ्याचे दररोज संकलन : पहिल्या दिवशी फक्त अडीच हजार जोडी डस्टबीनचे वितरण,प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून दोन लाख कपात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ५ जूनपासून ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार आहे. आता प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानातील नियमावलीचे कारण समोर करीत फक्त ओला कचरा दररोज तर वाळलेला कचरा आठवड्यातून दोनच दिवस गोळा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज कचरा संकलित केला जातो. यापुढे मात्र तसे होणार नाही. त्यामुळे पुढील पाच दिवस वाळलेला कचरा घरात कसा साठवून ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा संकलनासाठी डस्टबीनची व्यवस्था झालेली नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचीही पूर्ण व्यवस्था नाही. असे असले तरी ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, नागपूर महापालिका कचरा संकलनाची नवी व्यवस्था लागू करीत आहे. यासाठी पाहिजे तशी पूर्वतयारी झालेली नाही. मात्र, प्रशासनातर्फे ही व्यवस्था लागू करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कचरा संकलनाच्या व्यवस्थेची माहिती देण्यासाठी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले उपस्थित होते. या वेळी पार्डीकर म्हणाले, पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक झोनमध्ये २५० जोडी डस्टबीन वितरित केले जातील. यानंतर ३० जूनपर्यंत आलेल्या मागणीनुसार डस्टबीन उपलब्ध करून दिले जातील. केंद्र सरकारच्या दर करारानुसार एक जोडी डस्टबीनची किंमत २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
संदीप जोशी यांनी सांगितले की, ५.५० लाख जोडी डस्टबीन खरेदी करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका एवढी रक्कम स्वत: खर्च करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून दोन लाख रुपये यासाठी वळते केले जातील. याशिवाय महापौर निधीतून ५० लाख रुपये, उपमहापौर व स्थायी समिती निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये वळते केले जातील. अशाप्रकारे चार कोटी रुपये उपलब्ध होतील. याशिवाय शहरातील तीन खासदारांनी आपल्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये तसेच नऊ आमदारांनी प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

वर्षभरात होणार व्यवस्था
पुढील तीन महिन्यात ३० टक्के घरे व व्यावसायिक ठिकाणांहून कचरा गोळा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात ही व्यवस्था लागू होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. ओला व वाळलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था विकसित करण्याचे काम सुरू आहे, असा दावा संदीप जोशी यांनी केला.
भांडेवाडी कचरा वेचणाऱ्यांना प्रवेश
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा वेचणाऱ्यांना कचरा संकलन पॉर्इंटपर्यंत जाऊन वाळलेल्या कचऱ्यातून कचरा वेचण्याची तरतूद करण्यात आली आहे. शहरात महापालिकेचे दहा झोन असले तरी कचरा गोळा करण्याचे १० पॉर्इंट नाही. संपूर्ण शहराचा कचरा भांडेवाडी येथे गोळा केला जातो. त्यामुळे आता भांडेवाडीत कचरा वेचणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार भांडेवाडी येथे कचरा वेचणाऱ्यांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही.

Web Title: The dry garbage will be collected for two days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.