अमली पदार्थांची तस्करी : लेडी डॉन चंदा ठाकूर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:00 IST2020-09-29T23:59:18+5:302020-09-30T00:00:13+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली.

अमली पदार्थांची तस्करी : लेडी डॉन चंदा ठाकूर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली. शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील इतवारी रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थाची तस्करी करणारी चंदा लेडी डॉन म्हणून कुख्यात आहे. तिच्या अड्ड्यावर ३१ जुलैला गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला होता. यावेळी तिची मुलगी आरती ठाकूर तसेच नरेंद्र ऊर्फ बाल्या पवनीकर आणि रजनीश पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून २५ ग्राम हेरॉईन, तीस हजारांची दारू तसेच रोख एक लाख ६३ हजार रुपये असा एकूण तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. तेव्हापासून चंदा फरार होती. ती आपल्या कामठी मार्गावरच्या घरी परतल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने मंगळवारी भल्या सकाळी तेथे छापा घातला आणि चंदाला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
आत्महत्येची धमकी
चंदाच्या खोलीच्या दारावर बाहेरून कुलूप लावून होते. मात्र खबर पक्की असल्यामुळे पोलिसांनी खिडकीतून मोठ्याने आवाज देऊन चंदाला बाहेर येण्याचे आवाहन केले.
पोलीस अटक करून कोठडीत डांबणार याची कल्पना आल्यामुळे चंदाने पोलिसांना आत आल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. पोलिसांनी तिला दाद न देता दार तोडले आणि चंदाला ताब्यात घेतले.